लोकसभा निवडणूक ठरतीये IPL मधील अडथळा, BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत
IPL 2024 संबंधी एक मोठी घडामोड समोर येत आहे. बीसीसीआय आयपील स्पर्धा लवकर घेण्याच्या तयारीत आहे. यासह यावर्षी आयपीएल विदेशात भरवलं जाऊ शकतं अशीही शक्यता आहे.
IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगसंबंधी (Indian Premiere League) एक मोठी घडामोड समोर येत आहे. बीसीसीआय (BCCI) पुढील म्हणजेच आयपीएल 2024 लवकर घेण्याच्या तयारीत आहे. तसंच आयपीएल 2024 विदेशात होण्याचीही शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलमध्ये हे बदल अपेक्षित आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी लोकसभा निवडणूक (Lok Sabha elections) होणार असून यानिमित्ताने आय़पीएल 2024 लवकर खेळली जाण्याची शक्यता आहे. आम्हाला निवडणुकांची कल्पना असून, योजना आखताना आम्ही त्याचाही विचार करत आहोत.
लवकर खेळवली जाऊ शकते आयपीएल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गरज पडल्यास आयपीएल पुढील वर्षी मार्च महिन्यातच खेळवली जाऊ शकते. तसंच मे महिन्याच्या मध्यात अंतिम सामना खेळवत स्पर्धा संपवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान सध्या बीसीसीआयचं संपूर्ण लक्ष आगामी वर्ल्डकप 2023 वर आहे. आयपीएलसाठी अद्याप फार वेळ आहे. त्यामुळे आगामी काळातील घडामोडींवर अनेक गोष्टी अवलंबून असतील.
परदेशात खेळवली जाऊ शकते स्पर्धा
परदेशात आयपीएल खेळवण्यासंबंधी बीबीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे की, आम्ही याआधीही निवडणूक आणि स्पर्धा एकत्र आल्याने व्यवस्थितपणे संतुलन साधलं आहे. गरज पडल्यास आयपीएल 2024 विदेशातही खेळवू शकतो. पण आमची प्राथमिकता आयपीएल भारतातच व्हावी यासाठी असणार आहे. परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. पण अद्याप फार वेळ शिल्लक असल्याने जास्त काही बोलणं किंवा अंदाज लावणं योग्य ठरणार नाही.
मागील आयपीएल म्हणजेच 2023 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज संघ चॅम्पियन ठरला होता. अंतिम सामन्यात गुजरातचा पराभव करत चेन्नईने पाचव्यांदा खिताब जिंकला होता. यासह मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज 5-5 वेळा आयपीएल जिंकणारे संघ ठरले आहेत.
लोकसभा निवडणुकीमुळे दोन वेळा देशाबाहेर खेळवली IPL
आतापर्यंत दोन वेळा लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात आली आहे. 2009 लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत पार पडली होती. यानंतर 2014 लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचं दोन भागात विभाजन करण्यात आलं होतं. अर्धी स्पर्धा भारतात पार पडली होती, तर उर्वरित स्पर्धा युएईमध्ये झाली होती.