IPL 2024 PBKS vs MI: आयपीएल 2024 मध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सदरम्यान (MI vs PBKS) सामना रंगला. शेवटच्या षटकापर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने अवघ्या 9 धावांनी पंजाब किंगस्वर मात केली. पहिली फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने 7 विकेट गमावत 192 धावा केल्या. याला उत्तर देताना पंजाब किंग्सचा डाव 183 धावांवर आटोपला. मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय ठरला. तर पंजाब किंग्सचा हा पाचवा पराभव ठरला. या विजयामुळे मुंबईने पॉईंटटेबलमध्ये (IPL Point Table) थेट सातव्या क्रमांकावर झेप घेतली. तर पंजाबचा संघ नवव्या स्थानावर घसरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सने सामना जिंकला पण...
मुंबई इंडियन्साने हा सामना जिंकला असला तरी क्रिकेट चाहत्यांची मनं मात्र पंजाब किंग्सच्या युवा फलंदाजाने जिंकली. पंजाबच्या आशुतोष शर्माने (Ashutosh Sharma) तुफान फटकेबाजी करत मुंबई इंडियन्सला घाम फोडला. मुंबईच्या विजयाचा घास आशुतोषने जवळपास हिसकावला होता. अवघ्या 28 चेंडूत आशुतोशने 61 धावांची तुफान खेळी केली. यात त्याने 7 षटकार आणि 2 चौकार लगावले. 49 धावांवर पाच विकेट अशी पंजाबची अवस्था असताना मैदानावर आलेल्या शशांक सिंग (Shashank Singh) आणि आशुतोष शर्मा या युवा फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांसमोर नेटाने उभं राहात विजयासाठी संघर्ष केला. 


शशांक सिंह 41 धावांवर बाद झाला. त्याने 25 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार लगावत धावसंख्या वाढवली. शशांक बाद झाल्यानंतर आशुतोषने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत किल्ला लढवला. आशुतोषच्या फलंदाजीने पंजाबला एकवेळ अशक्य वाटणाऱ्या धावसंख्येजवळ आणून ठेवलं.


कोण आहे आशुतोष शर्मा?
पंजाब किंग्सचा युवा फलंदाज आशुतोष शर्मा सोशल मीडियावर अचानक चर्चेत आला आहे. आशुतोशचा जन्म मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये झाला, पण तो लहानचा मोठा इंदोरमध्ये झाला. इथेच त्याने क्रिकेटचे धडे गिरवले. चांगल्या क्रिकेटच्या फारशा सुविधा नसतानाही आशुतोषने आपला सराव बंद केला नाही. अनेक सामन्यात त्याने बॉल बॉय म्हणूनही काम केलं. मध्य प्रदेश रणजी ट्रॉफी खेळल्यानंतर 2022 मध्ये रेल्वेकडून खेळायला लागला. 


आशुतोषवर 20 लाखांची बोली
पंजाब किंग्सने आयपीएल 2024 मध्ये झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये आशुतोषवर 20 लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं. पण आपल्या खेळीने आशुतोषने भल्या भल्या फलंदाजांनाही मागे टाकलं आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात आशुतोषने पंजाबसाठी दमदार कामगिरी केली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आशुतोषने अवघ्या 16 चेंडूत 31 धावांची खेळी केली. त्यानंतर हैदराबादविरुद्ध नाबाद 33 धावा केल्या. 


युवराज सिंगचा विक्रम मोडला
आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक करत भारतीय दिग्गज फलंदाज युवराज सिंहचा विक्रम मोडण्याचा पराक्रम केलाय. 2023 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत आशुतोषने ही कामगिरी केली होती. युवराज सिंहने 12 चेंडूत अर्धशतकी खेळी होती. हा विक्रम आशुतोषने मागे टाकला.