रोहित शर्मा मुंबई संघ सोडण्याच्या चर्चांदरम्यान नवा VIDEO चर्चेत; आकाश अंबानीच्या गाडीत दोघे दिसले एकत्र
IPL 2024: मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी वानखेडे मैदानाबाहेर रोहित शर्मासह दिसले आहेत. मुंबई 12 एप्रिलला बंगळुरु संघाविरोधात मैदानात उतरणार आहे.
IPL 2024: पाच वेळा आयपीएल जिंकलेला मुंबई इंडियन्स संघ या हंगामात अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. गुणतालिकेत मुंबई संघ तळाशी आहे. मुंबई संघ चारपैकी एकच सामना जिंकला आहे. त्यात रोहित शर्मा पुढील हंगामात मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. रोहित शर्माने अधिकृतपणे यावर काहीही भाष्य केलेलं नाही. पण लखनऊ सुपरजायंट्सने रोहित शर्माला संघात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाचे सह-मालक आकाश अंबानी आणि रोहित शर्मा वानखेडे मैदानाबाहेर एकत्र दिसले आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना बंगळुरुविरोधात होणार आहे. वानखेडे मैदानावर 12 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु भिडणार आहे. या सामन्याआधी वानखेडे मैदानावर येताना आकाश अंबानी आणि रोहित शर्मा एकत्र दिसले. रोहित शर्मा आकाश अंबानींच्या गाडीतून वानखेडे मैदानात दाखल झाला. आकाश अंबानींच्या आलिशान गाडीत रोहित शर्मा पुढच्या सीटवर बसलेला दिसत आहे.
आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरु होऊन इतके दिवस झाल्यानंतरही अद्याप मुंबई इंडियन्समधील कर्णधारपदावरुन रंगलेला वाद मिटलेला नाही. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवणं अनेकांना आवडलेलं नाही. त्यातच आयपीएल 2025 च्या आधी मेगा लिलाव होणार आहे. यामध्ये अनेकदा संघ आपल्या खेळाडूंना रिलीज करत असतं. या लिलावात रोहित शर्मासंबंधी मोठी घडामोड पाहायला मिळू शकते. या घडामोडींदरम्यान आकाश अंबानी आणि रोहित शर्मा एकत्र दिसल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
आकाश अंबानी-रोहित शर्मा एकत्र दिसल्याने पुन्हा एकदा मुंबई संघाच्या भवितव्याची चर्चा रंगली आहे. याआधी सनरायजर्स हैदराबादविरोधातील सामन्यानंतर दोघे गंभीर चर्चा करताना दिसले होते. रोहित शर्माने या आयपीएल हंगामात 177.01 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. पण अद्याप त्याच्या नावावर एकही अर्धशतक जमा झालेलं नाही. रोहितने चार सामन्यात एकूण 118 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा मुंबई संघ सोडणार?
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जचा माजी खेळाडू अंबाती रायडूने यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. मुंबईत संघात जे झालं ते पाहता रोहित शर्मा जे चांगले वागणूक देतील अशा फ्रँचाईजीची निवड करेल असं परखड मत अंबाती रायडूने स्टार स्पोर्टशी संवाद साधताना म्हटलं आहे.
अंबाती रायडूने म्हटलं की, "दिवसाच्या शेवटी रोहितच निर्णय घेईल. त्याची इच्छा असेल त्या संघात तो जाईल. प्रत्येत संघाला तो आपल्याकडे यावा आणि संघाचं नेतृत्व करावं असं वाटत असेल. रोहितच काय तो निर्णय घेईल. मला खात्री आहे की, इथे जे झालं हे ते पाहता जी फ्रँचाईजी चांगली वागणूक देईल अशी संघाची रोहित शर्मा निवड करेल".