`...हा परत कार चालवायला निघून जाईल,` नेटकऱ्याच्या कमेंटवर ऋषभ पंतने एका इमोजीत दिलं उत्तर
भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात झाला होता. या जीवघेण्या अपघातातून वाचल्यानंतर तो क्रिकेटपासून दूर होता. पण अखेर आता तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यास सज्ज झाला आहे. आगामी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी त्याला हिरवा कंदील देण्यात आला आहे. ऋषभ पंत आता पूर्णपणे फिट असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अखेर 14 महिन्यानंतर ऋषभ पंत पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतचा भीषण कार अपघात झाला होता. जीवघेण्या अपघातातून तो थोडक्यात वाचला होता. पण जखमी असल्याने तो आयपीएल 2023 खेळू शकला नव्हता.
पण आगामी आयपीएल खेळण्यासाठी ऋषभ पंत आता पूर्णपणे फिट असल्याचं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने स्पष्ट केलं आहे. यामुळे आता तो पुन्हा एकदा दिल्लीचं नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने एक्सवर पोस्ट शेअर करत ऋषभ पंतचं स्वागत केलं आहे.
"पुन्हा एकदा गर्जना करण्यास सज्ज. ऋषभ पंत तुझं स्वागत आहे. तुला खेळताना पाहण्यास उत्सुक आहोत," अशी कॅप्शन दिल्ली कॅपिटल्सने दिली आहे. यावेळी त्यांनी ऋषभ पंतचा एक ग्राफिक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये मागे 'टायगर रिटर्न्स' लिहिलं आहे.
पण त्याच्या या फोटोचं एडिटिंग एका चाहत्याला अजिबात आवडलं नाही. आपण यापेक्षा चांगले ग्राफिक बनवले असते असा त्याचा दावा आहे. इतकंच नाही तर हे ग्राफिक पाहिल्यानंतर ऋषभ पंत पुन्हा एकदा कार चालवण्यासाठी जाईल असंही त्याने उपहासात्मकपणे म्हटलं. "यापेक्षा मी चांगलं बनवलं असतं. हे पाहिल्यावर पुन्हा कार चालवायला निघून जाईल," अशी कमेंट त्याने केली.
विशेष म्हणजे या कमेंटवर ऋषभ पंतनेही उत्तर दिलं. पण त्याने ते फार गांभीर्याने न घेतला हसतानाची इमोजी शेअर करत दाद दिली.
अपघातानंतर ऋषभ पंत एनसीएमध्ये दुखापतीतून सावरत होता. तिथे त्याला पुनर्वसन कार्यक्रमातून जावं लागलं. तिथे मेहनत घेतल्यानंतर फलंदाज आणि यष्टीरक्षक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडण्यास तो सज्ज झाला आहे. "30 डिसेंबर 2022 ला उत्तराखंडच्या रुकीजवळ कार अपघातात जखमी झाल्यानंतर 14 महिने अथक परिश्रम घेतलेल्या ऋषभ पंतला आगामी आयपीएल हंगामात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून खेळण्यासाठी पूर्णपणे तंदरुस्त घोषित करण्यात आलं आहे," अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
काही आठवड्यांपूर्वी ऋषभ पंतने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितलं होतं की, आपण डॉक्टरला बरं होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीतील सहा महिने कमी करणार असं म्हटलं होतं. "मी डॉक्टरांना विचारलं की मला बरं होण्यासाठी किती वेळ लागेल. मी त्यांना सांगितलं की प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहे, परंतु तुम्ही मला याबद्दल अधिक स्पष्टता द्याल. त्यांनी (डॉक्टर) सांगितलं की 16 ते 18 महिने लागतील. मी डॉक्टरांना सांगितलं होतं की, तुम्ही मला जी काही टाइमलाइन द्याल त्यातून सहा महिने मी कमी करेन," अशी माहिती ऋषभ पंतने दिली.