IPL 2024 Mumbai Indians Bus Stuck In Traffic Rohit Sharma Reaction: इंडियन प्रिमिअर लीगच्या 38 व्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने 9 गडी आणि 8 बॉल राखून मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभूत केलं. राजस्थानचा हा यंदाच्या पर्वातील सातवा विजय ठरला तर मुंबईसाठी हा पाचवा पराभवाचा धक्का ठरला आहे. मात्र या पराभावामुळे निराश झालेल्या मुंबई इंडियन्सच्या संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर सवाई मानसिंग स्टेडियममध्ये प्रवेश करतानाच हसू फुललं ते रोहित शर्मामुळे! खरं तर रोहित शर्मालाही सामन्यासाठी मैदानात प्रवेश करताना हसू अनावर झालं ते त्याच्या चाहत्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे. 


रोहितच्या नावाने घोषणाबाजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, सामन्यासाठी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर जात असतानाच मुंबई इंडियन्सच्या संघाची बस ट्रॅफिकमध्ये अडकली. मुंबईच्या संघाची टीम ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं पाहून क्रिकेट चाहत्यांनी या बसभोवती गर्दी केली. त्यानंतर बसमध्ये रोहित शर्माला पाहून बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांनी रोहितच्या नावाने घोषणाबाजी सुरु केली. 'हमारा कॅप्टन कैसा हो... रोहित शर्मा जैसा हो...', 'मुंबईचा राजा... रोहित शर्मा...' च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.


रोहितनेही दिला प्रतिसाद


जयपूरमध्येही मुंबईतील रस्त्यांवरील गर्दी वाटावी अशी गर्दी करुन चाहते रोहितसाठी घोषणाबाजी करत असल्याचं चित्र पाहून मुंबईच्या संघातील क्रिकेटपटूंना आश्चर्य वाटलं. बसमध्ये बसलेल्या रोहित शर्मानेही चाहत्यांना हात दाखवून, स्मीतहास्य करत चाहत्यांच्या या प्रेमळ स्वागताचा स्वीकार केला. मुंबई इंडियन्सच्या बससमोरील गर्दी बाजूला करुन पोलिसांनी वाट मोकळी करुन देईपर्यंत रोहित शर्माचे चाहते त्याच्या नावाचा जयघोष या ठिकाणी करत होते. 



चाहत्याने केली मदत


ट्रॅफिकमध्ये मुंबईच्या संघाची बस अडकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यानेही हे ट्रॅफिक क्लिअर करुन संघाला मैदानात पोहोचण्यासाठी मदत केल्याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला होता. सन्नी नावाच्या तरुणाने वाहतूककोंडी दूर करण्यास मदत केल्याचं या व्हिडीओत दिसत असून त्यासाठी संघाने त्याला थँक यू म्हटलंय.



पराभवानंतर हार्दिक काय म्हणाला?


या सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आला. मात्र संपूर्ण सामाना खेळवला गेला तरी चाहत्यांची गर्दी कायम होती. घरच्या मैदानावर खेळताना राजस्थानने हा सामना जिंकला. या सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पंड्याने आमच्या कामगिरीमध्ये कमतरता राहिल्याचं मान्य केलं. "या सामन्यातून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं. आम्ही ज्या चूका केल्या त्यामधून शिकू आणि त्या पुन्हा करणार नाही याची काळझी घेऊ. पुढे वाटचाल करत राहणं महत्त्वाचं आहे. संघामध्ये आणि वैयक्तिक स्तरावरही आम्ही आमच्या कमतरता मान्य करुन त्यावर काम केलं पाहिजे. मला टिका टीप्पणी करायला आवडत नाही. मला खेळाडूंच्या पाठिशी उभं राहायला आवडतं. चांगलं क्रिकेट खेळण्यास प्राधान्य असतं. आमच्या प्लॅननुसार खेळणं आणि आम्ही बेसिक चूका करणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असते. आपण जोपर्यंत क्रिकेट हे साधेपणे खेळतो तोपर्यंत ते साधं आणि सोपं असतं," असं हार्दिक म्हणाला.


नक्की वाचा >> ना गिल, ना हार्दिक, ना अय्यर, ना ऋतू रोहितनंतर 'या' खेळाडूला करा T-20 चा कॅप्टन; हरभजनची मागणी


राजस्थानचा सातवा विजय


राजस्थानने खेळलेल्या 8 सामन्यांपैकी मुंबईविरुद्धचा विजय हा त्यांचा यंदाच्या पर्वातील 7 वा विजय आहे. सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये राजस्थानचा संघ पहिल्या स्थानी आहे. राजस्थानच्या संघाचे एकूण 14 पॉइण्ट्स असून त्यांच्या इतके सामने कोणीही जिंकलेले नाहीत. दुसऱ्या स्थानी असलेल्या कोलकात्याच्या संघाने 5 सामने जिंकले आहेत. राजस्थानचं प्लेऑफमधलं स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे. सामान्यपणे 8 सामने जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये राहून प्लेऑफसाठी पात्र ठरतो. राजस्थानला 8 विजयांसाठी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे.