तुला इतर संघांविरोधात शतक ठोकता येत नाही का? गावसकरांची यशस्वी जयस्वालला विचारणा, `फक्त मुंबई....`
IPL 2024: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिलेलं 180 धावांचं आव्हान फक्त 18 ओव्हर्स 4 चेंडूत पूर्ण करत राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आणखी एका विजयाची नोंद केली. या सामन्यात मुंबईकर यशस्वी जैसवालने शतक ठोकलं.
IPL 2024: आयपीएलच्या या हंगामात अखेर यशस्वी जैसवालची बॅट चांगली तळपली असून, मुंबई इंडियन्सविरोधातील सामन्यात त्याने शतक ठोकलं आहे. आयपीएलमधील यशस्वी जैसवालचं हे दुसरं शतक ठरलं. यशस्वी जैसवालने केलेल्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा सहज पराभव केला. विशेष म्हणजे यशस्वी जैसवालने आपली दोन्ही शतकं मुंबई इंडियन्सविरोधात ठोकली आहेत. पहिल्यांदा त्याने 62 चेंडूत 124 धावा केल्या होत्या. तर सोमवारी झालेल्या सामन्यात 60 चेंडूत 104 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने राजस्थानसमोर 180 धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थान रॉयल्सने 18.4 ओव्हर्समध्येच हे आव्हान पूर्ण केलं.
यशस्वी जैसवालने कर्णधार संजू सॅमसनसह 109 धावांची भागीदारी केली. संदीप शर्माने या सामन्यात 18 धावांमध्ये 5 विकेट्स घेत सामनावीर पुरस्कार पटकावला. पण आपल्या या जबरदस्त खेळीने यशस्वी जैसवालने आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात आपला विचार करण्यासाठी भाग पाडलं आहे.
सामन्यानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी यशस्वी जैसवालची मुलाखत गेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक मुंबईकराच्या मनात असणारा प्रश्न यशस्वीला विचारला. यशस्वी जैसवाल मुंबईचा असून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरोधात त्याचा चांगला रेकॉर्ड आहे. यामुळे गावसकरांनी त्याला तू नेहमी मुंबईविरोधातच चांगलं कसं काय खेळतोस? अशी विचारणा केली.
सुनील गावसकरांनी यशस्वीला विचारलं की, "हे तुझं मुंबई इंडियन्सविरोधातील दुसरं शतक आहे. तू मुंबईचा मुलगा आहे. असं काय आहे की तू त्यांच्याच विरोधात शतकं ठोकत आहेस? तू इतरांविरोधात ही शतकं ठोकू शकत नाहीस का?".
यावर यशस्वी जैसवालने उत्तर दिलं की, "असं काही नाही, मी जे चांगलं आहे तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवस आव्हानात्मक, तर काही चांगले असतात. मी फक्त खेळत होतो, इतकंच. माझ्या डोक्यात काहीच नव्हतं".
दरम्यान या पराभवानंतर मुंबईचा पुढील प्रवास आता फारच आव्हानात्मक असणार आहे. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सध्या 7 व्या स्थानी कायम आहे. मुंबईचा नेट रननेट -0.23 असल्याने आता त्यांना नेट रननेट देखील सुधारावा लागणार आहे.
मुंबई इंडियन्सला आणखी 6 सामने खेळायचे आहेत. मुंबईला जर प्लेऑफ गाठायचं असेल तर उर्वरित 6 सामन्यांपैकी 5 सामने तरी जिंकावे लागणार आहेत. या 6 सामन्यांपैकी मुंबईला लखनऊविरुद्ध 2 आणि केकेआरविरुद्ध 2 सामने खेळायचे आहेत. तर तगड्या हैदराबादसोबत 1 सामना तर दिल्लीविरुद्ध देखील 1 सामना खेळायचा आहे. उर्वरित 6 सामन्यांपैकी 3 सामने मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेवर खेळणार आहे. त्यामुळे आता मुंबईसाठी ही एक जमेची बाजू असेल.