Indian Squad For T20 WC: आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत. यात अनेख खेळाडूंनी गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर दमदार कामगिरी केली आहे. विशेषत: अनकॅप्ड खेळाडूंनी सर्वांना आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आयपीएलच्या (IPL 2024) सतराव्या हंगामाचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे पुढच्याच महिन्यात 4 जून पासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) खेळवला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमधल्या कामगिरीच्या आधारे टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड केली जाईल याचे संकेत बीसीसीआय (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांनी याआधी दिले होते. आतापर्यंत आयपीएलमध्ये झालेल्या सामन्यातील कामगिरीच्या आधारे टीम इंडियासाठी खेळाडूंची निवड झाली तर कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल हे जाणून घेऊया. 


या खेळाडूंना मिळू शकते संधी?
आयपीएलच्या यंदाच्या हंगातील कामगिरीचा विचार करता टीम इंडियात सलामीसाठी रोहित शर्मा आणि सनरायजर्स हैदाराबादचा अभिषेक शर्मा पहिला पर्याय असतील. आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणारा विराट कोहली तिसऱ्या क्रमांकासाठी पसंती असेल. पाच सामन्यात 316 धावा करणारा विराटकडे ऑरेंज कॅप आहे. मधल्या फळीत रियान पराग, शिवम दुबे, रिंकू सिंह आणि साई सुदर्शन यांची मजबूत दावेदारी आहे. याशिवाय राहुल तेवतियाचाही नंबर लागू शकतो. टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सकडून पहिले तीन सामने खेळू शकला नव्हता. चौथ्या सामन्यात त्याला संधी मिळाली. पण भोपळा न फोडताच तो माघारी परतला. आता उर्वरीत सामन्यात त्याची कामगिरी कशी असेल याकडेही निवड समितीचं लक्ष असेल.


फिरकी गोलंदाजीसाठी युजवेंद्र चहल, आर अश्विनने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलीय. याशिवाय रवी बिश्नोईनेही निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह, मोहित शर्मा, खलील अहमद यांचा समावेश केला जाऊ शकतो. तर लखनऊ सुपर जायंट्सचा स्पीड स्टार मयंक यादव हा टी20 वर्ल्ड कपसाठी पहिली पसंती असेल. 


या खेळाडूंना संधी नाही
आयपीएल 2024 मधील कामगिरीचा विचार केला तर विकेटकिपर-फलंदाज ईशान किशन, केएल राहुल आणि शुभमन गिल यांना आतापर्यंत फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे टी20 वर्ल्ड कप संघात जागा मिळवण्यासाठी त्यांना आपली कामगिरी सिद्ध करावी लागणार आहे.


आयपीएलचे आतापर्यंत केवळ 22 सामने खेळले गेलेत. आणखी स्पर्धेचा बराच टप्पा बाकी आहे. त्यामुळे अनेक खेळाडू आपला दावा ठोकू शकतात. आता बीसीसीआय निवड समिती कोणत्या खेळाडूंना संधी देणार हे पाहाणं उत्सुकतेचं असणार आहे. 


अशी असले टी20 वर्ल्ड कपसाठी संभाव्य टीम इंडिया
रोहित शर्मा, अभिषेक शर्मा, विराट कोहली, रियान पराग, शिवम दुबे, रिंकू सिंह, साई सुदर्शन, दिनेश कार्तिक, राहुल तेवतिया, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, मोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि मयंक यादव.