IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) पंजाबविरोधातील (Punjab Kings) सामन्यात नवव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. विशेष म्हणजे शार्दुल ठाकूरही महेंद्रसिंग धोनीच्या आधी फलंदाजीसाठी उतरला होता. धोनीच्या या निर्णयाने चाहते आणि क्रिकेटतज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या होत्या. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनीही यावरुन धोनीला खडेबोल सुनावले होते. जर त्याला इतक्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला यायचं असेल तर त्याने संघातही राहू नये अशा शब्दांत त्यांनी टीका केली होती. पण आता धोनीच्या या निर्णयामागील खरं कारण समोर आलं आहे. धोनी दुखापतीमुळे फलंदाजीला नवव्या क्रमांकावर आल्याची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, धोनीच्या पायातील स्नायू फाटले आहेत ज्यामुळे त्याला मैदानावर जास्त वेळ धावणं शक्य होत नाही. म्हणूनच, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उत्सुक नाही. कारण त्याला विकेट्दरम्यान आधीप्रमाणे धावणं जमत नाही आहे. 


याआधीच्या सामन्याआधी महेंद्रसिंग धोनीने डेरेल मिशेलला एक धाव नाकारल्याने टीका झाली होती. मिशेलने स्वत: दोन धावा पळून काढल्या होत्या. धोनीने या चेंडूवर एकही धाव न काढल्याने इरफान पठाणने त्याच्यावर टीका केली होती. या सामन्यात धोनी नंतर धावबाद झाला होता. 


दरम्यान सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही अक्षरश: आमच्या बी संघासह खेळत आहोत. जे धोनीवर टीका करत आहेत त्यांना धोनी संघासाठी किती बलिदान देत आहे याची कल्पना नाही". या रिपोर्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, संघाचा दुसरा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे उपलब्ध असता तर धोनीला किमान काही सामन्यांसाठी विश्रांती दिली असती.


उपलब्ध माहितीनुसार, धोनी मैदानात उतरण्याआधी औषधं घेत आहे. आपली दुखापत आणखी वाढू नये यासाठी तो कमीत कमी धावत आहे. डॉक्टरांनी धोनीला विश्रांती घेण्यास सांगितलं आहे, पण त्याच्याकडे खेळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.


गतवर्षीही धोनी आयपीएलदरम्यान दुखापतीने त्रस्त होता. गुडघ्याला दुखापत झालेली असताना त्याने चेन्नईसाठी अनेक सामने खेळले होते. आयपीएल हंगाम संपल्यानंतर धोनीच्या गुडघ्याची सर्जरीही झाली होती. 


चेन्नईला या हंगामात दुखापतींच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. डेव्हॉन कॉनवे आधीच बाहेर पडला आहे, तर मथीशा पाथिरानानेही दुखापतीमुळे परतला आहे. भारतीय गोलंदाज दीपक चहरही पायाच्या दुखापतीमुळे पुनरागमन करण्याची शक्यता नाही.