IPL 2024: गुजरात टायटन्सविरोधातील सामन्यात चेन्नईच्या खेळाडूंनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. यावेळी अनेक चांगले झेल घेण्यात आले. अजिंक्य रहाणेने डाईव्ह करत डेव्हिड मिलरचा झेल घेतला. रचिन रवींद्रनेही क्षेत्ररक्षणात आपली कमाल दाखवली. पण महेंद्रसिंह धोनीने सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं. धोनीने हवेत झेपावत विजय शंकरचा झेल घेतला. 42 वर्षीय धोनीने 2.7 मीटरपर्यंत डाइव्ह मारत एका हाताने झेल घेतला. धोनीची कामगिरी पाहून क्रिकेटविश्व पुन्हा एकदा भारावलं आहे. धोनीचा जुना सहकारी आणि माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही त्याचं कौतुक केलं आहे. पण यावेळी त्याने त्याचा उल्लेख 'म्हातारा' असा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"चांगले झेल तुम्हाला सामने जिंकवून देतात. अजिंक्य रहाणेने चांगला झेल घेतला. रचीन रविंद्रनेही चांगली कामगिरी केली. म्हाताऱ्या धोनीनेही एक झेल घेतला," असं सेहवाग Cricbuzz वर म्हणाला. या चर्चेत रोहित गावसकरही सहभागी होता. त्याने यावर तात्काळ व्यक्त होत म्हटलं की, "तू रहाणेला म्हातारा म्हटलं नाहीस". पण सेहवाग आपल्या वक्तव्यावर ठाम राहत म्हटला की, धोनी आणि अजिंक्य रहाणेच्या वयात फार मोठा फरक आहे. 


"त्यांचं वय सारखं नाही. त्यात फरक आहे आणि अजिंक्य रहाणे धोनीपेक्षा जास्त फिट आहे. 35 वर्ष आणि 41 वर्ष यात फार मोठं अंतर आहे. धोनी आता म्हातारा होत चालला आहे आणि यात कोणतीही शंक नाही," असं सेहवागने म्हटलं आहे. 


दरम्यान पहिल्यांदाच संघाचं नेतृत्व करणारा ऋतुराज गायकवाडही संघाच्या खेळाडूंचं क्षेत्ररक्षण पाहून फार प्रभावित झाला. "मी क्षेत्ररक्षण पाहूनही प्रभावित झालो आहे. यावर्षी कदाचित एक, दोन तरुण खेळाडू जास्त आहेत. अजिंक्य रहाणेनेही चांगले प्रयत्न केले. मागच्या सामन्यातही तो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावत होता. क्षेत्ररक्षण आमच्यासाठी मोठा मुद्दा आहे," असं तो म्हणाला.


चेन्नईचा सलग दुसरा विजय


चेन्नईने आयपीएलमध्ये आपली विजयरथ कायम ठेवला आहे. चेन्नईने गुजरातचा 63 धावांनी पराभव करत आपल्या सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. गुणतालिकेत ते सध्या पहिल्या क्रमांकावर आहेत. 


चेन्नईने गुजरातविरोधात प्रथम फलंदाजी करताना जबरदस्त कामगिरी केली केली. रचिनने 20 चेंडूत 46 धावा ठोकत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. तसंच शिवम दुबेने 23 चेंडूत 51 धावा ठोकत संघाला 206 धावसंख्या उभारण्यात मदत केली. गुजरातचा संघ 8 गडी गमावत फक्त 143 धावा करु शकला.