`तुमच्याकडे जर साधं...`, सेहवागने के एल राहुलवर भरमैदानात ओरडणाऱ्या संजीव गोयंकांना सुनावलं, `जर असंच वागलात...`
IPL 2024: लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी कर्णधार के एल राहुलला भरमैदानात सुनावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट वर्तुळातून संताप व्यक्त होत आहे. यादरम्यान विरेंद्र सेहवागला संजीव गोयंका यांना इशारा दिला आहे.
IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि पंजाब किंग्स संघाचा माजी मेंटॉर विरेंद्र सेहवागने लखनऊ संघाचा मालक संजीव गोयंका यांना सुनावलं आहे. संजीव गोयंका यांनी कर्णधार के एल राहुलला भरमैदानात सुनावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर क्रिकेट वर्तुळातून संताप व्यक्त होत असून, विरेंद्र सेहवागने संजीव गोयंका यांना इशारा दिला आहे. एक व्यावसायिक म्हणून सनरायजर्स हैदराबादविरोधातील पराभवामुळे त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही असं सेहवागने सांगितलं. तसंच संघाने कशीही कामगिरी केली तरी संघमालक चांगला नफा कमावतात अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. संघाचं एकमेव नुकसान होऊ शकतं ते म्हणजे आयपीएलचा हंगाम संपण्याआधी के एल राहुल संघ सोडू शकतो असा इशाराही सेहवागने दिला आहे.
हैदराबादविरोधातील सामन्यात लखनऊ संघाचा 10 विकेट्सने लाजिरवाणा पराभव झाला होता. या सामन्यानंतर संजीव गोयंका के एल राहुलवर संतापल्याचं लाईव्ह टीव्हीवर दिसलं होतं. संजीव गोयंका संतापात बोलत असताना के एल राहुल मात्र शांत उभा राहून ऐकत होता. तो देत असलेला स्पष्टीकरणही संजीव गोयंका ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
Cricbuzz शी बोलताना विरेंद्र सेहवागने म्हटलं की, "संघमालकाने जर त्यांच्याकडे काही सकारात्मक आणि प्रेरणादायी असं काही सांगण्यासारखं असेल तरच संघाची भेट घ्यावी. क्रिकेटच्या जबाबदाऱ्या त्यांनी कर्णधार आणि सपोर्ट स्टाफवर असाव्यात".
“मालकाची भूमिका अशी असली पाहिजे की जेव्हा ते खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये किंवा पत्रकार परिषदेदरम्यान तेव्हा केवळ त्यांना प्रेरित करण्यासाठी बोललं पाहिजे. पण मालकाने येऊन जर 'काय चाललंय? समस्या काय आहे?' असं विचारलं तर? किंवा संघ व्यवस्थापन सदस्यांपैकी एकाला पकडलं आणि एखाद्या विशिष्ट खेळाडूबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली? प्रशिक्षक आणि कर्णधार हे संघ चालवत असतात त्यामुळे या मालकांनी खेळाडूंशी संबंध न ठेवणे किंवा त्यांच्यावर रागावणं चांगलं नाही," असं तो म्हणाला.
"हे सर्वजण व्यावसायिक आहेत. त्यांना फक्त नफा आणि तोटा कळतो. पण येथे काहीच तोटा नाही. मग त्यांना नेमकी कशाची चिंता सतावत आहे? तुम्ही 400 कोटींचा नफा कमवत आहात. हा एक व्यावसाय असून, तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. याची काळजी घेण्यासाठी तुमच्याकडे लोक आहेत. काहीही झालं तरी तुम्ही नफा कमावत आहात. त्यामुळे तुमचं काम फक्त खेळाडूंचं मनोबल वाढवणं आहे. आयपीएलमध्ये खेळाडू जर मी एक संघ सोडला तर दुसरा संघ घेईल असा विचार करतो. जर तुम्ही खेळाडू गमावला तर जिंकण्याची संधी शून्य होते. जेव्हा मी पंजाब संघ सोडला तेव्हा ते पाचव्या क्रमांकावर आले होते. कोणत्याही हंगामात ते पाचव्या क्रमांकावर आले नव्हते," असं विरेंद्र सेहवागने सांगितलं.
संजीव गोयंका संतापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर के एल राहुल लखनऊ संघ सोडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 12 सामन्यानंतर लखनऊ संघ सहाव्या स्थानावर आहे. अखेरच्या 2 सामन्यांमध्ये के एल राहुल संघाचं कर्णधारपद सोडण्याचीही शक्यता आहे.