`तुम्ही तो विराट कोहली आहे हे विसरुन जा,` संजय मांजरेकरने RCB चाहत्यांना सुनावलं, म्हणाला `तो आता दिग्गज वैगेरे...`
IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) विराट कोहलीला (Virat Kohli) बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाचा कर्णधार करण्याच्या विरोधात आहे. तो आता टी-20 मधील महान खेळाडूंच्या यादीत नाही असंही त्याने म्हटलं आहे.
IPL 2025: आयपीएल मेगा लिलावाआधी (IPL Mega Auction) सर्वांना उत्सुकता असलेल्या रिटेंशनचा (IPL Player Retentions) निर्णय अखेर झाला आहे. आयपीएल संघांनी कोणत्या खेळाडूंना रिटेन केलं जाणार आहे हे जाहीर केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाने फक्त तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे. यामध्ये पहिलं रिटेंशन अपेक्षित असून, तो खेळाडू विराट कोहली आहे. त्याच्यासह रजत पाटीदार आणि यश दयाल यांना रिटेन करण्यात आलं आहे. यादरम्यान आयपीएल 2025 मध्ये विराट कोहली पुन्हा एकदा आयपीएल संघाचं नेतृत्व करताना दिसेल अशी चर्चा रंगली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) मात्र विराट कोहलीला (Virat Kohli) बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाचा कर्णधार करण्याच्या विरोधात आहे. तो आता टी-20 मधील महान खेळाडूंच्या यादीत नाही असंही त्याने म्हटलं आहे. त्याने मागील हंगामात 700 पेक्षा अधिक धावा केल्या असल्या तरी मांजरेकर मात्र त्याचा आता संदर्भ घेण्यास तयार नाही.
"माझा फक्त चाहत्यांना एकच प्रश्न आहे की, जर विराट कोहलीच्या जागी दुसरा खेळाडू असता तर? तुम्ही तुमच्या डोक्यातून विराट कोहलीला काढा, आणि फक्त त्याची आयपीएलमधील कामगिरी पाहा. त्याची फलंदाजी आणि कर्णधार म्हणून कामगिरी पाहा. यानंतर त्याला कर्णधार करणं योग्य आहे की नाही याचा विचार करा. आयपीएल 2024 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 150 होता. त्याआधी तो 110-120 होता," असं संजय मांजरेकरने स्टार स्पोर्ट्सला सांगितलं.
"एक टी-20 खेळाडू म्हणून विराट कोहली आता तोच प्रभाव पाडू पडतो का? तो विराट कोहली आहे म्हणून, 95 टक्के चाहत्यांना त्याने कर्णधार व्हावे असं वाटतं. पण जर तुम्ही फक्त त्याच्या कामगिरीचा विचार केला तर ते इतके प्रभावी नाही. माझी हीच समस्या आहे, फक्त तो हिरो आहे म्हणून भावनांमध्ये वाहून जायचं नाही. मला क्रिकेटच्या तर्कापासून दूर जायचे नाही, एक कसोटी खेळाडू म्हणून माझा विश्वास आहे की विराट कोहलीची संघाला गरज आहे. पण टी-20 मध्ये आता तो दिग्गज खेळाडू राहिलेला नाही,” असंही तो पुढे म्हणाला.
आरसीबीने त्यांचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसला रिलीज केलं असून नवीन कर्णधाराच्या शोधात आहेत. यापूर्वी, कोहलीने 2013 मध्ये डॅनियल व्हिटोरीकडून आरसीबीचे कर्णधारपद स्वीकारले होते. कोहलीने 2016 च्या हंगामातही बंगळुरु संघाचं नेतृत्व केलं होतं. 2021 मध्ये त्याने कर्णधारपद सोडलं. आरसीबीने रिटेन केल्यानंतर कोहलीने व्हिडिओ शेअर करत सांगितलं की, म्हणाला, "पुढच्या वर्षीपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या तीन वर्षांसाठी मला आरसीबीने पुन्हा एकदा कायम ठेवलं आहे हे सांगताना मला आनंद होत आहे. मी नेहमीप्रमाणेच रोमांचित आहे".
"आरसीबी माझ्यासाठी काय आहे हे सर्वांनाच ठाऊक आह. गेल्या अनेक वर्षांपासून हे एक अतिशय खास नातं आहे, जे आणखी मजबूत होत आहे. मी आरसीबीसाठी खेळताना जे अनुभवले ते खरोखरच खास आहे, आणि मला आशा आहे की चाहते आणि प्रत्येकजण संघाशी जोडलेला असेल. फ्रँचायझीलाही असंच वाटतं,” असंही तो पुढे म्हणाला. पुढे बोलताना कोहली म्हणाला, "पुढील सायकलमध्ये किमान एकदा तरी विजेतेपद पटकावण्याचे आमचे ध्येय आहे आणि आम्ही नेहमीप्रमाणेच आमची सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही आमचे क्रिकेट ज्या प्रकारे खेळतो त्याचा सर्वांना अभिमान वाटेल."