IPL 2025 Mega Auction: के एल राहुलचं भवितव्य अखेर ठरलं! लखनऊचा मेंटॉर झहीर खानचा मोठा निर्णय
IPL 2025 Mega Auctionके एल राहुल (KL Rahul) 2022 मध्ये लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) संघाशी जोडला गेला. पण 2025 च्या मेगा लिलावात लखनऊ संघ त्याला रिलीज करण्याची शक्यता आहे.
IPL 2025 Mega Auction: आगामी आयपीएल 2025 लिलावात लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) संघ के एल राहुलला संघातून रिलीज करण्याची शक्यता आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने (IPL Governing Council) रिटेंशनचे नियम ठरवल्यानंतर आता सर्व संघ मेगा लिलावाची गणितं आखत आहेत. नव्या नियमांचा फायदा घेत कशाप्रकारे जुन्या खेळाडूंना संघात कायम ठेवत, नवे खेळाडूही खरेदी करता येतील यासाठी सर्व संघ रणनीती ठरवत आहेत. यादरम्यन के एल राहुलचं भवितव्य काय असेल याबाबत चर्चा सुरु होती. के एल राहुलचा मागील आयपीएल आणि टी-20 मधील फॉर्म पाहता त्याला पुन्हा संधी मिळेल का? याबाबत साशंकता व्यक्त होत होती. दरम्यान समोर आलेल्या रिपोर्टनुसार, लखनऊ संघमालकांनी के एल राहुलच्या बाजूने आपलं मत दिलेलं नाही.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, लखनऊ संघाचा मेंटॉर झहीर खान आणि प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी मागील आयपीएलमध्ये संघाच्या कामगिरीत आणि पराभवात के एल राहुलची नेमकी काय भूमिका होती याचा आढावा घेतला. आकडेवारी पाहण्यात आली असता के एल राहुलने जितके चेंडू खेळले आहेत, ते पाहता संघाच्या पराभवाची शक्यता जास्त असल्याचं दिसून आलं.
"एलएसजी व्यवस्थापन ज्यामध्ये मेंटॉर झहीर खान आणि प्रशिक्षक जस्टीम लँगर यांचा समावेश आहे त्यांनी संपूर्ण आकडेवारी तपासली. यावेळी लक्षात आलं की, जेव्हा जेव्हा के एल राहुलने जास्त चेंडू खेळले आणि धावा केल्या तेव्हा तेव्हा संघाचा पराभव झाला. म्हणजेच के एल राहुलची फलंदाजी सामन्याला साजेशी नव्हती. इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे आता धावसंख्या जास्त होण्याची शक्यता वाढली आहे. अशात वरच्या फळीतील फलंदाज जास्त चेंडू आणि वेळ घेत असेल तर ते संघाला परवडणारं नाही," असं आयपीएलमधील सूत्राने सांगितलं आहे.
दरम्यान वेगवान गोलंदाज मयांक यादवला पुन्हा रिटेन करणं जवळपास निश्चित आहे असंही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. फ्रँचायझीने कायम ठेवलेल्या टॉप 3 खेळाडूंपैकी तो एक असण्याची शक्यता आहे. "मयांक हा लखनऊने शोधलेला खेळाडू आहे. कोणीही त्याला ओळखत नव्हतं तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली आणि सामन्यावर त्याचा कसा प्रभाव पडू शकतो हे त्याने दाखवून दिले," असं अहवालात पुढे म्हटले आहे.
आयुष बडोनी आणि मोहसिन खान यासारख्या अनकॅप्ड खेळाडूंना फ्रँचायझीकडून कायम ठेवण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्सने जर ऋषभ पंतला रिलीज केलं तर लखनऊ संघ कर्णधारपदासाठी त्याला विकत घेण्यास उत्सुक आहे असंही सांगितलं जातं.