IPL 2025 Retaintion List CSK: इंडियन प्रिमिअर लीग 2025 च्या पर्वाआधी मेगा ऑक्शन म्हणजेच महा लिलाव पार पडणार आहे. यापूर्वी सर्व दहा संघांना कोणते खेळाडू रिटेन करायचे आहेत यासंदर्भात अंतिम निर्णय जाहीर करण्याची मुदत गुरुवारी संपली. गुरुवारीच सर्व संघांनी त्यांच्याकडील कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार याची यादी जाहीर केली आहे. तसेच कोणत्या खेळाडूला किती रक्कम देऊन रिटेन करत आहोत, हे सुद्धा संघांनी सांगितलं आहे. सरासरी सर्वच संघांनी 4 ते 5 खेळाडूंना रिटेन केलं आहे. विराट कोहली, रोहित शर्मासारख्या खेळाडूंना मोठी रक्कम देऊन त्यांच्या संघाने रिटेन केलं आहे. विराट कोहलीला 21 कोटी मोजून बंगळुरुच्या संघाने रिटेन केलं आहे तर रोहितला रिटेन करण्यासाठी मुंबईने 16 कोटी 30 लाख रुपये मोजले आहेत. या रिटेनशनच्या यादीमध्ये चेन्नईच्या संघाने पाच खेळाडूंना रिटेन केलं आहे. विशेष म्हणजे या रिटेशनदरम्यान चेन्नईचा माजी कर्णधार आणि संघाला पाच वेळा चषक जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. धोनीला सर्वात कमी रक्कम मोजत रिटेन करण्यात आलं आहे.


चेन्नईने कोणाकोणाला केलं करारमुक्त?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या संघाने डेव्होन कॉनवे, रचिन रविंद्र, दिपक चहार, शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडेसारख्या खेळाडूंना करारमुक्त केलं आहे.. यापैकी रचिनने यंदाच्या पर्वात उत्तम फटकेबाजी केलेली असतानाही त्याला रिलीज करण्यासंदर्भात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र त्याचवेळी चेन्नईच्या संघाने पाच जणांना रिटेन केलं आहे. कोणाला किती पैसे देऊन रिटेन करण्यात आलं आहे पाहूयात...


सर्वाधिक मानधन ऋतुराजला


चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने रिटेंशन करताना सर्वात पहिलं प्राधान्य ऋतुराज गायकवाडला दिलं आहे. ऋतुराजला 18 कोटी रुपयांना सीएसकेने रिटेन केलं आहे. त्याखालोखाल श्रीलंकेचा गोलंदाज मथिशा पाथिरानाला 13 कोटी देत रिटेन करण्यात आलं आहे. सीएसकेने शुभम दुबेला 12 कोटींना रिटेन केलं आहे. रविंद्र जडेजाला रिटेन करण्यासाठी चेन्नईच्या संघाने 18 कोटी रुपये मोजले आहेत. महेंद्र सिंग धोनीला सर्वात कमी रक्कम देत रिटेन करण्यात आलं असून त्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

नक्की वाचा >> Mumbai Retention: 'जे खेळाडू देशाचं...'; बुमराह, सूर्या, पांड्याला अधिक पैसे मिळणार समजल्यावर रोहित स्पष्टच बोलला


धोनीची एकूण पगार कपात किती?


महेंद्र सिंग धोनीला 2024 च्या पर्वाला 12 कोटी रुपये देत संघात कायम ठेवलं होतं. मात्र यंदा धोनीला केवळ 4 कोटींमध्ये रिटेन करण्यात आलं आहे. म्हणजेच धोनीला तब्बल 8 कोटी रुपये कमी दिले जाणार आहेत. याचाच अर्थ 8 कोटी रुपयांची पगारकपात स्वीकारुन धोनीने सीएसकेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीचं हे शेवटचं आयपीएल असेल असं मानलं जात आहे. धोनी 2024 च्या आयपीएलनंतर चाहत्यांसाठी आणखी एक वर्ष खेळणार आहे, असं जाहीर केलं होतं.