IPL 2019 Auction: सिक्सर किंग युवीचा १६ कोटी ते १ कोटीचा प्रवास
आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव जयपूरमध्ये पार पडला.
जयपूर : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव जयपूरमध्ये पार पडला. या लिलावामधली सगळ्यात धक्कादायक बाब ठरली ती युवराज सिंगचं विकलं न जाणं. आयपीएलच्या सुरुवातीच्या सत्रामध्ये युवराज सिंगवर कोणीच बोली न लावल्यामुळे त्याच्या अनेक चाहत्यांची निराशा झाली. आत्तापर्यंतच्या आयपीएल लिलावामध्ये कधीच युवराज सिंगवर अशी नामुष्की ओढावली नव्हती. पण लिलावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मात्र मुंबईनं युवराजला १ कोटी रुपये देऊन विकत घेतलं. मुख्य म्हणजे या लिलावात युवराजची बेस प्राईजही १ कोटीच होती.
आयपीएलच्या लिलावासाठी सगळ्या ८ टीमनी मिळून ३४६ खेळाडूंची यादी तयार केली होती. यातल्या ६० क्रिकेटपटूंवर बोली लागली. त्यातले ४० क्रिकेटपटू भारतीय आणि २० परदेशी होते.
लिलावाच्या सुरुवातीला ३७ वर्षांच्या युवराजचं नाव घेण्यात आलं तेव्हा कोणत्याच टीमनं उत्साह दाखवला नाही. अखेर दुसऱ्या सत्रामध्ये मुंबईनं युवराजला टीममध्ये घ्यायचा निर्णय घेतला.
२०१५ सालच्या आयपीएलमध्ये युवराज सिंग सगळ्यात महाग खेळाडू होता. दिल्लीच्या टीमनं युवराजला १६ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. २०१४ साली बंगळुरूनं युवराजला १४ कोटी रुपयांना विकत घेतलं. यानंतर मागच्या मोसमात युवराज पंजाबच्या टीमकडून खेळला होता. आयपीएलच्या सुरुवातीलाही युवराज पंजाबच्या टीममध्ये होता. एवढच नाही तर त्यानं पंजाबच्या टीमचं नेतृत्वही केलं होतं. या टीमखेरीज युवराज बंगळुरू, हैदराबाद, पुणे या टीमकडूनही खेळला. यावेळी मात्र पहिल्यांदाच तो मुंबईच्या निळ्या जर्सीमध्ये दिसणार आहे.
२००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ सालच्या वर्ल्ड कपमध्ये झालेल्या भारताच्या विजयामध्ये युवराज सिंगचा मोलाचा वाटा होता. २००७ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध युवराज सिंगनं स्टुअर्ट ब्रॉडला ६ बॉलमध्ये ६ सिक्स मारून रेकॉर्ड केलं. तर २०११ सालच्या वर्ल्ड कपमध्ये युवराजनं ऑलराऊंड कामगिरी केली. त्यामुळे त्याला मॅन ऑफ द टुर्नामेंट देऊनही गौरवण्यात आलं. फक्त हे दोन वर्ल्ड कपच नाही तर अनेक मॅचमध्ये युवराजनं भारताला एकहाती सामने जिंकवून दिले आहेत. पण कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर युवराजच्या फिटनेसविषयी समस्या निर्माण झाल्या आणि याचा परिणाम त्याच्या फॉर्मवर झाला. असं असलं तरी युवराजची क्रिकेट खेळण्यासाठीची झुंज अजूनही कायम आहे.