मुंबई : २०१९ सालच्या आयपीएलसाठी जयपूरमध्ये १८ डिसेंबरला लिलाव होणार आहे. बीसीसीआयनं सोमवारी याबद्दल घोषणा केली आहे. यावर्षी फक्त ७० खेळाडूंवर बोली लागणार आहे. यातले ५० खेळाडू भारतीय आणि २० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ८ टीमकडे लिलावामध्ये बोली लावण्यासाठी १४५ कोटी २५ लाख रुपयांची मर्यादा आहे. यावर्षी आयपीएलच्या लिलावाची जागाही बदलण्यात आली आहे. मागच्यावर्षी बंगळुरूमध्ये लिलाव झाला होता.


दिल्लीनं सर्वाधिक खेळाडू सोडले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या महिन्यामध्ये आयपीएलच्या टीमनी कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. दिल्लीच्या टीमनं सर्वाधिक १३ खेळाडू बाहेर केले. तर गतविजेत्या चेन्नईनं ३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. चेन्नईनं सगळ्यात कमी खेळाडूंना बाहेर केलं. आयपीएलच्या एकूण ८ टीमनी मिळून ७१ खेळाडू बाहेर केले. हे खेळाडू आता कोणत्याच टीममध्ये नसल्यामुळे ते लिलावात सामील होऊ शकतात. २०१९ साली आयपीएलचा १२वा मोसम खेळवण्यात येणार आहे.


युवराज, गंभीरही बाहेर


आयपीएलच्या टीमनी काही मोठ्या खेळाडूंनाही बाहेर केलं आहे. यामध्ये पंजाबच्या युवराज सिंग आणि दिल्लीच्या गौतम गंभीरचा समावेश आहे. २०१८ साली लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सगळ्यात महागडा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. राजस्थाननं उनाडकटला ११.५० कोटी रुपये देऊन विकत घेतलं. पण यावर्षी मात्र उनाडकटला राजस्थाननं बाहेर काढलं.


हैदराबादनं विकेट कीपर ऋद्धीमान सहा आणि वेस्ट इंडिजचा टी-२० टीमचा कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटला टीम बाहेर केलं. मुंबईच्या टीमनं जेपी ड्युमिनी, पॅट कमिन्स, मुस्तफिजुर रहमान या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला.


देशाबाहेर होणार आयपीएल?


२०१९ सालचं आयपीएल आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी आहेत. त्यामुळे आयपीएलचा काही भाग किंवा संपूर्ण आयपीएल भारताबाहेर घेतलं जाऊ शकतं. मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांवेळीही अशाचप्रकारे आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात आलं. २०१४ सालच्या निवडणुकीवेळी अर्धी आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आली आणि उरलेले आयपीएलचे सामने पुन्हा भारतात खेळवले गेले. २००९ साली संपूर्ण आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती.