आयपीएल : दिल्ली डेअरडेव्हिल्सचं नवीन नाव, आता दिल्ली कॅपिटल्स
आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स या टीमनं त्यांचं नाव बदललं आहे.
नवी दिल्ली : आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स या टीमनं त्यांचं नाव बदललं आहे. २०१९ च्या मोसमात दिल्लीची टीम दिल्ली कॅपिटल्स या नावानं मैदानात उतरेल. ४ डिसेंबरला टीमनं या नव्या नावाची घोषणा केली. नावाबरोबरच दिल्लीच्या टीमनं त्यांचा लोगोही बदलला आहे. दिल्लीची टीम पहिल्या मोसमापासूनच आयपीएलमध्ये आहे. पण एकदाही त्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. सुरुवातीच्या मोसमात टीम सेमी फायनलमध्ये पोहोचली होती. पण यानंतर त्यांची कामगिरी सातत्यानं ढासळली.
दिल्लीच्या टीमनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्यांच्या नव्या नावाची घोषणा केली. 'दिल्लीकरांनो, दिल्ली कॅपिटल्सला हॅलो म्हणा' असं ट्विट दिल्लीच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलं. दिल्ली कॅपिटल्स टीमच्या नवीन लोगोमध्ये ३ वाघ दिसत आहेत. दिल्लीच्या टीमचे मालक आणि जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सकडून याबद्दल पत्रकार परिषद घेण्यात आली. नवीन नावासह टीमचं भवितव्यही बदलेलं अशी अपेक्षा आहे.
शिखर धवन दिल्लीच्या टीममध्ये
आयपीएलच्या पुढच्या मोसमात शिखर धवन दिल्लीच्या टीमकडून खेळणार आहे. मागच्या मोसमात धवन हैदराबादच्या टीममध्ये होता पण यावेळी तो नव्या दिल्लीच्या जर्सीमध्ये दिसेल. शिखर धवन त्याचं स्थानिक आणि प्रथम श्रेणी क्रिकेटही दिल्लीकडून खेळतो.
गौतम गंभीरला दिल्लीनं वगळलं
मागच्या मोसमात दिल्लीनं गौतम गंभीरला त्यांच्या टीममध्ये घेतलं होतं. दिल्लीकडून स्थानिक क्रिकेट खेळणारा गंभीर त्याआधी कोलकात्याचा कर्णधार होता. मागच्या मोसमात गंभीर पुन्हा दिल्लीच्या टीममध्ये आला आणि त्याला कर्णधार बनवण्यात आलं. पण खराब फॉर्ममुळे आयपीएलच्या मध्यातच गंभीरनं कर्णधारपद सोडलं. कर्णधारपद सोडल्यानंतर गंभीर दिल्लीच्या टीमकडून खेळलाही नाही. यानंतर श्रेयस अय्यरकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं. २०१९च्या मोसमाआधी दिल्लीच्या टीमनं गौतम गंभीरला वगळलं.