IPL 2022 | पक्के वैरी होणार चांगले मित्र, खेळणार एकाच संघातून, कोण आहेत ते दोघे?
या दोन्ही स्टार खेळाडूंमध्ये गेल्या वर्षी 2021 मध्ये कडाक्याचं वाजलं होतं. तेव्हा या वादाची जोरदार चर्चा होती.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा लिलावात (IPL Mega Auction 2022) अनेक खेळाडू मालामाल झाले. खेळाडूंवर फ्रँचाईजींकडून पैशांचा पाऊस पाडण्यात आला. अनेक युवा खेळाडूंवर कोटींची बोली लावण्यात आली. आयपीएलमुळे स्थानिक आणि युवा खेळाडूंना हक्काचं असं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. या स्पर्धेमुळे अनेकांमध्ये असलेले दुरावे कमी झाले. कट्टर असलेले वैरी हे चांगले मित्र झाले. आता असेच 2 सख्खे वैरी आयपीएलमुळे एकाच टीमकडून खेळणार आहेत. (ipl mega auction 2022 deepak hudda and kruanl pandya will play lucknow team after controversy)
आपण बोलतोय ते टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू दीपक हुड्डा (Deepak Hudda) आणि कृणाल पंड्या (Krunal Pandya) या दोघांबाबत. आयपीएलच्या 15 व्या मोसमात हे दोघे लखनऊकडून खेळणार आहेत. लखनऊने मेगा ऑक्शनमध्ये दीपकसाठी 5 कोटी 75 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. तर लखनऊने कृणालसाठी 8 कोटी 25 लाख रुपये खर्च केले.
हे दोघे खेळाडू आता एकाच टीमकडून खेळणार आहेत. तसेच या खेळाडूंमधील वैर संपेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या दोघांमध्ये गेल्या वर्षी 2021 मध्ये कडाक्याचं वाजलं होतं. एकमेकांनी मारहाण आणि शिवीगाळीचे आरोप केले होते.
नक्की काय झालं होतं?
जानेवारी 2021 मध्ये सय्यद मुश्ताक अली स्पर्धा सुरु होती. याआधी कृणाल आणि दीपकमध्ये वाद झाल्याचं समोर आलं होतं. रिपोर्ट्सनुसार, तेव्हा दीपकने बडोदा क्रिकेट असोसिएशनकडे (Baroda Cricket Association) कृणाल विरोधात तक्रार दिली होती.
पांड्याने मला वाईट वागणूक दिली, त्याने मला अपशब्द वापरले, तुझं क्रिकेट करिअर संपवेन, अशी धमकी दिल्याचंही हुड्डा म्हणाला होता.
या सर्व घडलेल्या प्रकारामुळे दीपकने स्पर्धेतून माघार घेण्याचं म्हटलं होतं. त्यावेळेस हा वाद चांगलाच पेटला होता. दोघांनी एकमेकांविरोधात वादावादी केल्याता आणि शिवीगाळ केल्याचा आरोप लावला होता.
मात्र आता आयपीएलमध्ये लखनऊने या दोघांना आपल्या ताफ्यात घेतलं आहे. त्यामुळे आतातरी या दोघांमधील वादाच्या 'मालिकेला' पूर्णविराम मिळेल का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.