IPL Retention 2025:  इंडियन प्रिमिअर लीग 2025 च्या पर्वासाठी मेगा ऑक्शन होणार आहे. यासाठी कोणता संघ कोणाला रिटेन करणार म्हणजेच कायम ठेवणार यासंदर्भातील यादी लवकरच जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून कोणाला कायम ठेवलं जातं याबद्दल मुंबईच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. असं असतानाच आता मुंबई कोणाला रिटेन करणार यासंदर्भातील माहिती समोर आली आहे.


संघाची सुमार कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सने 2024 च्या पर्वासाठी हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून विकत घेत थेट कर्णधार केलं. मात्र याचा संघावर चांगला परिणाम होण्याऐवजी उलटा परिणाम झाला. संघाची कामगिरी खालावली. अर्थात यासाठी हार्दिकच जबाबदार होता असं नाही सांघिक खेळ करण्यात मुंबईला अपयश आल्याने मुंबई इंडियन्सचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्येही तळाशी राहिला. असं असतानाच अचानक पदावरुन उचलबांगडी झालेला रोहित शर्मा संघात राहणार की लिलावात सहभागी होणार? मुंबई इंडियन्सचा संघ हार्दिकला डच्चू देणार का? याबद्दल चर्चा सुरु होती. या चर्चांना "क्रिकबझ'च्या वृत्ताने पूर्णविराम मिळाला आहे. 


ही दोन नावं जवळपास निश्चित


समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स ज्या खेळाडूंना रिटेन करु शकते त्यामध्ये पहिलं नाव कर्णधार हार्दिक पंड्याचं आहे. हार्दिक पंड्या कर्णधार असल्याने रिटेन्शनच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. हार्दिकबरोबरच रोहित शर्मालाही संघ रिटेन करणार आहे. रोहित शर्माकडे असलेला अनुभव आणि त्याने संघासाठी दिलेलं योगदान पाहता त्याच्यासारखा खेळाडू रिटेन न करणं संघाला परवडणार नाही. रोहितने किमान काही वर्ष संघाबरोबर रहावं अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा असल्याचं समजतं. 


नक्की वाचा >> IPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय?


हे महत्त्वाचं नावही संघात राहणार कायम


भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघात कायम राहणार असल्याचं रिटेन्शनच्या संभाव्य यादीमधून स्पष्ट होत आहे. सूर्यकुमार याच संघातून अंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचला असून भविष्यातील वाटचालीच्या दुष्टीने तो संघासाठी फार महत्त्वाचा आहे. सूर्यकुमार यादवच मुंबईच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज 2025 च्या पर्वातही कायम राहणार हे स्पष्ट आहे.



अनपेक्षित नावाचाही समावेश


याशिवाय जगातील सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहलाही मुंबईचा संघ कायम ठेवणार आहे. सामन्याच्या सुरुवातीला आणि शेवटच्या षटकांमध्ये मोजक्या धावा देत महत्त्वाचे गडी बाद करण्याची कामगिरी बुमराहने आतापर्यंत मुंबईसाठी अगदी चोखपणे बजावली आहे. अपेक्षेप्रमाणे तरुण खेळाडूंपैकी तिलक वर्माला रिटेन केलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे या दिग्गज क्रिकेटपटूंबरोबर एका अपेक्षित नावाचाही संभाव्य रिटेन खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. यामध्ये मुंबईच्या संघातील मान धीरलाही रिटेन केलं जाईल असं सांगितलं जात आहे.