मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण रोहित शर्माकडून स्पष्ट, तर इशान किशनबद्दल सांगितली ही गोष्ट
आरसीबीविरुद्धच्या दारुण पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला...
मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने कबूल केले आहे की, त्याच्या फलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध चांगली कामगिरी केली नाही. आरसीबीने मुंबई इंडियन्सला फक्त 111 धावांवर बाद केले. एवढेच नाही तर पहिली विकेट मुंबईच्या एकूण धावसंख्येवर 57 धावांवर पडली, तर रोहित शर्मा स्वतः 79 धावांच्या एकूण धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर संघाने 32 धावांच्या आत सर्व विकेट्स गमावले.
आरसीबीविरुद्धच्या दारुण पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला, "आमच्या बाजूने हा एक चांगला गोलंदाजीचा प्रयत्न होता असे मला वाटले. एका वेळी असे वाटले की आरसीबी 180-प्लस धावा करतील. परंतु तसे झाले नाही. गोलंदांनी आपला चांगला खेळ दाखवला परंतु, फलंदाजांनी आम्हाला निराश केले. आमचे दोन विकेट पडल्यानंतर त्यांनी आमच्यावर दबाव ठेवला."
हिटमॅन पुढे म्हणाला, "आम्ही ज्या परिस्थितीत आहोत त्यावर मात करण्याची गरज आहे. आम्ही ते पूर्वीही केले आहे. फक्त या हंगामात ते घडत नाही आहे. आम्हाला आणखी मेहनत घेण्याची गरज आहे. इशान किशन एक प्रतिभावान खेळाडू आहे. गेल्या वर्षी त्याचा खेळ चांगला होता. आम्हाला त्याच्या तटस्थ खेळाला पाठिंबा द्यायचा आहे, त्यामुळेच तो सूर्याच्या वर फलंदाजी करत आहे. आम्हाला खेळाडूंवर जास्त दबाव आणायचा नाही. हे युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करत आहेत. "
आयपीएलचा सध्याचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आहे, पण हा हंगाम मुंबईसाठी विशेष राहिला नाही. मुंबईने आपले 10 सामने खेळले आहेत आणि आतापर्यंत केवळ 4 सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे, मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे, परंतु पुढील प्रवास खूप कठीण आहे, कारण रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला त्यांच्या शेवटच्या चार सामन्यांमध्ये पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागणार आहे.