आयपीएल 2025 मधील लिलाव फार मोठा असेल. आयपीएलमध्ये जेव्हा मेगा ऑक्शन होतं तेव्हा संघाचं पूर्ण कोअर टीमच बदलली जाते. आयपीएलमध्ये 10 फ्रॅचाईंजना नेमके किती खेळाडू रिटेन करण्याची संधी दिली जाईल याबद्दल बरेच अंदाज वर्तवले जात आहेत. यात सर्वाधिक लक्ष मुंबई इंडियन्सकडे आहे. याचं कारण त्यांच्याकडे सध्याचा भारताचा टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मा, त्यांचा सध्याचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्स या सर्व सुपरस्टार खेळाडूंना रिटने करतंय का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. पण यादरम्यान सोशल मीडियावर एक अफवा पसरली आहे. लखनऊ सुपरजायंट्सचे (Lucknow Super Giants) मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) रोहित शर्माला (Rohit Sharma) संघात घेण्यासाठी 50 कोटींची ऑफर देणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान संजीव गोयंका यांनी स्वत: यावर भाष्य केलं आहे.  


स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत संजीव गोयंका यांना रोहित शर्माबद्दल विचारण्यात आलं. "लखनऊने रोहित शर्मासाठी 50 कोटी रुपये वेगळे ठेवले असल्याची अफवा पसरली आहे. हे खरे आहे का?" असं संजीव गोयंकाना विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना संजीव गोयंका यांनी या अफवा असल्याचं म्हटलं. जर एकाच खेळाडूवर 50 टक्के रक्कम खर्च केली तर उर्वरित 22 खेळाडूंचं व्यवस्थापन कसं करणार? अशी विचारणा त्यांनी केली आहे. 


"मला एक सांगा तुम्हाला किंवा कोणालाही रोहित शर्मा लिलावात येणार आहे की नाही याबद्दल माहिती आहे का? हे सर्व अंदाज कोणत्याही कारणाविना लावले जात असून, निराधार आहेत. मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करेल किंवा नाही, तो लिलावात येईल की नाही याबद्दल माहिती नाही. पण जरी तो आला तरी एकाच खेळाडूलवर सॅलरी कॅपमधील 50 टक्के रक्कम खर्च केल्यास इतर 22 खेळाडूंचं काय?," असं संजीव गोयंका म्हणाले आहेत. 


रोहित शर्मा तुमच्या अपेक्षित खेळाडूंच्या यादीत आहे का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर संजीव गोयंका यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. "प्रत्येकाची एक अपेक्षित खेळाडूंची यादी असते. तुम्हाला संघात सर्वोत्तम खेळाडू हवे असतात. तुम्हाला संघासाठी सर्वोत्तम कर्णधार हवा असतो. जे तुम्हाला मिळालं आहे आणि जे उपलब्ध आहे त्यातून निवड करायची असते. तुम्हा त्यासह काय करता हे महत्त्वाचं असतं. मला कोणत्याही खेळाडूची अपेक्षा असू शकते. पण फ्रँचाईजीचं मतंही महत्त्वाचं असतं. तुम्हाला प्रत्येकजण मिळत नाही," असं ते म्हणाले.