LokSabha Election : `मला विश्वास आहे तू...`, युसूफला तिकीट मिळाल्यावर इरफानला भावना अनावर, म्हणतो...
Irfan Pathan On Yusuf Pathan : टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर युसूफ पठाण याने आता राजकारणाच्या पीचवर एन्ट्री (Yusuf Pathan in Politics) केली आहे. त्यावर आता धाकडा भाऊ इरफान पठाण याने थोरल्या भावाला शुभेच्छा दिल्या आहेत.
Yusuf Pathan in Politics : लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) आता सर्वच पक्षांमध्ये तारेवरची कसरत पहायला मिळत आहे. त्यासाठी आता उमेदवारांची यादी देखील हळूहळू जाहीर होतीये. काही कलाकार तसेच खेळाडूंना देखील लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर युसूफ पठाण (Yusuf Pathan) याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीकडून (TMC Baharampur) तिकीट मिळालं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व 42 जागांसाठी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यावेळी युसूफ पठाणच्या नावाची घोषणा झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्याविरुद्ध युसूफने शड्डू ठोकला आहे. अशातच आता युसूफ पठाणचा छोटा भाऊ इरफान पठाण (Irfan Pathan Post) याने भावूक पोस्ट केली आहे.
काय म्हणाला इरफान पठाण?
तुझा संयम, दयाळूपणा, गरजूंना मदत आणि अधिकृत पद नसतानाही लोकांची सेवा सहज लक्षात येण्याजोगी आहे. मला विश्वास आहे की तू एकदा राजकीय भूमिकेत पाऊल टाकलं की तुम्ही लोकांच्या दैनंदिन जीवनात खरोखरच बदल घडवून आणशील, असंही इरफान पठाण याने भावाचं कौतूक करत म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसने लोकसभेच्या जागांसाठी 42 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये युसूफ पठाण याच्यासह आणखी एका खेळाडूचं नाव जाहीर झालं आहे. 1983 वर्ल्ड कपचे स्टार कीर्ती आझाद यांना दुर्गापूर लोकसभा जागेसाठी तृणमूल काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलंय. त्यामुळे आता युसूफ पठाण कीर्ती आझाद यांच्याप्रमाणे राजकारणाच्या मैदानावर आपली चमक दाखवणार का? असा सवाल विचारला जात आहे.
मोहम्मद शमी राजकारणात येणार?
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. शमीने बंगालच्या बसीरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी भाजपची इच्छा आहे, परंतु यावर अंतिम निर्णय त्यालाच घ्यायचा आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.
युसूफ पठाणची कारकीर्द
दरम्यान, 41 वर्षीय माजी अष्टपैलू युसूफ पठाणने भारतासाठी 57 एकदिवसीय आणि 22 टी-20 सामने खेळले आहेत. युसूफने एकदिवसीय सामन्यांमध्ये 27 च्या सरासरीने 810 धावा आणि टी-ट्वेंटीमध्ये 146.58 च्या स्ट्राइक रेटने 236 धावा कुटल्या आहेत. आपल्या पावरफुट हिटसाठी प्रसिद्ध असणाऱ्या युसूफची आता राजकीय कारकीर्द कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.