भयंकर! ईशान किशनच्या डोक्याला लागला बॉउन्सर; काळजाचा चुकला ठोका
फलंदाजी करताना गोलंदाज लाहिरू कुमारचा एक बाऊंसर किशनच्या थेट डोक्यावर जाऊन आदळला.
धर्मशाला : श्रीलंकेविरूद्धचा दुसरा टी-20 सामना भारताने जिंकून सिरीजही आपल्या नावे केली आहे. या सामन्यात ओपनिंगला उतरलेला इशान किशन फ्लॉप ठरला. मात्र फलंदाजी करताना गोलंदाज लाहिरू कुमारचा एक बाऊंसर किशनच्या थेट डोक्यावर जाऊन आदळला. यानंतरही इशानने फलंदाजी केली. आऊट झाल्यानंतर मात्र इशानला तातडीने रूग्णालयात दाखल करावं लागलं.
इशानला हिमाचल प्रदेशातील कांगडा इथल्या रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचं स्कॅन करण्यात आलं. सध्या त्याला नॉर्मल वॉर्डमध्ये भर्ती करण्यात आलं आहे.
3.2 ओव्हरमध्ये लाहिरूने 146 किमी वेगाने एक जोरदार बाउन्सर टाकला. हा बॉल थेट इशानच्या डोक्यावर जाऊन बसला. बॉल लागताच इशान हेल्मेट काढून जागीच बसला होता.
बॉल लागूनही फलंदाजी केली
इशानला बॉल लागल्यानंतर फिजियोने त्याची तपासणी केली. त्यानंतर इशान फलंदाजी करण्यासाठी तयार झाला. मात्र यानंतर तो मोठी खेळी खेळू शकला नाही. त्याने 15 बॉलमध्ये 16 रन्स केले.
टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिले होतं. टीम इंडियाने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17 चेंडूंआधी पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा सलग 11 वा विजय ठरला. मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या विजयाचा हिरो ठरला.