IPL 2024: `अनेक गोष्टी तुमच्या...`, BCCI आणि रणजी ट्रॉफी वादावर ईशान किशनने अखेर सोडलं मौन
IPL 2024: आयपीएलचा हंगाम सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) विकेटकिपर ईशान किशन (Ishan Kishan) चांगलाच चर्चेत होता. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळत नसल्याने बीसीसीआयने (BCCI) त्याला इशारा दिला होता. यानंतर अखेर वार्षिक करारातून त्याला वगळण्यात आलं.
IPL 2024: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) विकेटकिपर ईशान किशन (Ishan Kishan) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरोधात झालेल्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. बंगळुरुने दिलेल्या 197 धावांचा पाठलाग करताना ईशान किशनने 34 चेंडूत 69 धावा ठोकल्या. दरम्यान आयपीएलचा हंगाम सुरु होण्याआधी ईशान किशन चांगलाच चर्चेत होता. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळत नसल्याने बीसीसीआयने (BCCI) त्याला इशारा दिला होता. यानंतर अखेर वार्षिक करारातून त्याला वगळण्यात आलं. बंगळुरुविरोधातील सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर ईशान किशनने मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्याने आयपीएलच्या आधी त्याच्याभोवती झालेल्या वादांवर भाष्य केलं.
ईशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. तसंच पुढील काळातही इतर आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी तो उपलब्ध नव्हता. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीबीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी वारंवार रणजी खेळण्याचा आग्रह केल्यानंतरही ईशान किशनने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. याउलट ईशान किशन गुजरातमध्ये हार्दिक पांड्यासह आगामी आय़पीएलसाठी तयारी करत होता.
या सर्व वादांवर भाष्य करताना ईशानने म्हटलं आहे की, "मी सराव करत होतो. मी जेव्हा खेळातून वेळ काढून बाहेर पडलो तेव्हा लोक फार बोलत होते. सोशल मीडियावरही अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. पण तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की, अनेक गोष्टी खेळाडूंच्या हातात नसतात".
ईशानने विश्रांती घेतलेल्या काळात आपल्या विचारसरणीत मोठा बदल केला. त्याने आपली विचार प्रक्रिया बदलण्याचा प्रयत्न केला. खासकरुन करिअरमध्ये जेव्हा वाईट वेळ असते त्याबद्दल त्याने विचार केला.
"एकमेव गोष्ट जी तुम्ही करु शकता ती म्हणजे वेळेचा अगदी योग्य वापर करणे. तसंच जुन्या ईशान किशनची विचारसरणी काय होती याचाही विचार केला. जरी गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असले तरी मी पहिल्या दोन ओव्हरमध्ये एकही चेंडू सोडणार नाही. वेळेसह मला आता 20 ओव्हर्सचा सामनाही मोठा असल्याचं समजलं आहे. तुम्ही तुमची वेळ घेऊन पुढील वाटचाल करु शकता. आम्ही सामने हारलो असलो तरी टीम म्हणून एकत्र काम करायचं आहे. मी जेव्हा चांगली कामगिरी करत नव्हतो तेव्हाही बदल दिसले आहेत. जर आणखी एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत नसेल तर मी त्याच्याशी बोलतो. ते काय विचार करतात हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ब्रेकमध्ये मला या गोष्टींची फार मदत झाली," असं ईशान किशननेस सांगितलं.