T20 World Cup 2021: शार्दूल ठाकूर की इशान किशन? कोण घेणार हार्दिकची जागा?
न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यात काही मोठे बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मुंबई : टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्स राखत पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात विराट कोहली वगळता भारतीय संघाचा कोणताही गोलंदाज विशेष कामगिरी करू शकला नाही. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यात काही मोठे बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
येत्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याला वगळलं जाण्याची दाट शक्यता आहे. हार्दिकची केवळ गोलंदाजीच नाही तर फलंदाजीतही त्याची कामगिरी अत्यंत खराब असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याला कोणता खेळाडू रिप्लेस करणार यावर अनेक चर्चा होतायत.
हा खेळाडू घेणार हार्दिक पंड्याची जागा?
गेल्या काही काळापासून हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी बनला आहे. हार्दिकची फलंदाजीही काही फारशी चांगली कामगिरी करू शकलेली नाही. हार्दिकला फलंदाज म्हणून खालील ऑर्डरमध्ये स्थान देण्यात येईल, असे निवडकर्त्यांनी वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी सांगितलं होतं.
अशा स्थितीत पुढील सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये असणारा धावणारा इशान किशन हार्दिकची जागा घेऊ शकतो. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात इशानने उत्तम खेळी केली होती. याशिवाय आयपीएलमध्येही ईशानची बॅट तळपली होती. अशा स्थितीत विराट कोहली पुढील सामन्यात इशानला संधी देऊ शकतो.
भूवीच्या जागी मिळू शकते शार्दूलला संधी
टीम इंडियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरचा टीममध्ये समावेश करणार असल्याचं म्हटलं जातंय. शार्दूल गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही गोष्टी सांभाळू शकतो. तो टीम इंडियाचा सर्वात मोठा गम चेंजर का मानला जातो हे त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही अनेकदा दाखवून दिलं. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यात भुवनेश्वरच्या जागी त्याला प्लेइंग 11 मध्येही स्थान दिलं जाऊ शकतं.
हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त
हार्दिक पांड्यालाही पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खांद्याला दुखापत झाली होती. शाहीन आफ्रिदीचा एक चेंडू थेट हार्दिकच्या खांद्यावर लागला. त्यामुळे तो संपूर्ण सामन्यात फिल्डींगसाठी आला नाही. हार्दिक या स्पर्धेपूर्वीही पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. हार्दिकच्या जागी इशान किशन 5-6 व्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करू शकतो.