WTC Final नंतर करिअरसाठी ईशान किशननं सोडली Team India ची साथ?
Ishan Kishan News: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर भारतीय संघातील खेळाडूंवर सडकून टीका झाली. पण, ईशान किशननं एकाएकी हा दुरावा का पत्करला? पाहा
Ishan Kishan News: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियानं (Ins Vs Aus) दारूण पराभव केला. यानंतर सर्व स्तरांतून भारतीय क्रिकेट संघावर टीकेची झोड उठवण्यात आली. कर्णधार रोहित शर्मा म्हणू नका किंवा मग संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणू नका. प्रत्येकाच्याच चुका अनेकांनी अधोरेखित केल्या. इथून संघ या वळणावर सावरत नाही तोच आणखी एक धक्का देणारं वृत्त समोर आलं.
WTC Final नंतर संघातील खेळाडू ईशान किशन यानं एकाएकी संघाची साथ सोडल्यामुळं सर्वांनाच धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार ईशाननं त्याच्या कारकिर्दीसाठी हा मोठा निर्णय घेतला. इथं वेस्ट इंडिजच्या संघासोबतच्या सामन्यांसाठी एका महिन्याहून कमी काळ शिल्लक असतानाच ईशाननं दलीप ट्रॉफीसाठीच्या पूर्व क्षेत्र संघातून नाव मागं घेतलं आहे. ज्यामुळं भारत ए च्या कर्णधारपदी आता अभिमन्यू ईश्वरन संघाच्या कर्णधारपदी असणारप आहे. तर, शाहबाज नदीम संघाच्या उपकर्णधारपदी असेल.
निवड समितीशी संपर्क साधला असता ईशानचा एकंदर फॉर्म पाहता त्याच्याकडे कर्णधारपद जाणं अपेक्षित होतं. पण, दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधला असता ईशाननं दलीप ट्रॉफी खेळण्यात स्वारस्य दाखवलं नाही. यासाठी कोणतंही कारण त्याच्या वतीनं पुढे करण्यात आलेलं नाही. ज्यामुळं त्याच्याऐवजी अभिषेक पोरेल याची निवड करण्यात आली.
का घेतला इतका मोठा निर्णय?
यष्टीरक्षक आणि फलंदाज ईशान किशन याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात 15 सदस्यीय संघात निवड करण्यात आली होती. पण, प्लेइंग 11 मध्ये मात्र त्याची वर्णी लागली नाही. थोडक्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुर्लक्षित राहिल्यानंतर ईशाननं बहुधा क्रिकेटच्या या दीर्घकाळ चालणाऱ्या फॉरमॅटपासून दुरावा पत्करत टी20 आणि एकदिवसीय सामन्यावर लक्ष देण्याचा निर्णय़ घेतल्याचं कळत आहे.
हेसुद्धा वाचा : बॉलिवूड सुपरस्टारची पत्नी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी आली, भावात घासाघीसही केली; पाहा Video
वेस्ट इंडियसोबतच्या दौऱ्याविषयी थोडं...
भारतीय संघ नव्या जोमानं वेस्ट इंडिजविरोधात मैदानात उतरणार आहे. या दौऱ्यामध्ये संघ 2 कसोटी सामने, 3 एकदिवसीय सामने आणि 5 टी20 सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा हा दौरा 12 जुलैपासून सुरु होणार असून, 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. आता या दौऱ्यात संघ किमान समाधानकारक कामगिरी करतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.