आयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांतची काऊंटीमध्ये सनसनाटी बॉलिंग
इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी क्रिकेट खेळणारा ईशांत शर्मानं भेदक बॉलिंग केली आहे.
मुंबई : इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी क्रिकेट खेळणारा ईशांत शर्मानं भेदक बॉलिंग केली आहे. ससेक्सच्या टीममधून पदार्पण करणाऱ्या ईशांत शर्मानं वारविकशायरच्या ५ विकेट घेतल्या. ईशांत शर्माच्या इन स्विंग आणि आऊट स्विंगमुळे वारविकशायरच्या खेळाडूंना बॅटिंग करणं कठीण जात होतं. काऊंटीच्या ४ दिवसांच्या मॅचमध्ये मोसमाचाही ईशांतनं भरपूर फायदा करून घेतला. ईशांतनं पहिल्या इनिंगमध्ये ५३ रन्स देऊन ३ विकेट तर दुसऱ्या इनिंगमध्ये १६ रन्स देऊन २ विकेट घेतल्या. ससेक्स आणि वारविकशायरमधली ही मॅच ड्रॉ झाली.
म्हणून ईशांत इंग्लंडमध्ये
भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी फास्ट बॉलर इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी क्रिकेट खेळणार का नाही असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. सुरुवातीला नकार देणारा ईशांत शर्मा अखेर काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी तयार झाला. आयपीएलच्या लिलावावेळी कोणत्याही टीमनं विकत न घेणं हेदेखील सुरुवातीला काऊंटी न खेळण्याचं कारण होतं. शेवटी ईशांत शर्मानं काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी ससेक्सबरोबर करार केला. जोफ्रा आर्चर आणि क्रिस जॉर्डन उपस्थित नसल्यामुळे ईशांतला ससेक्सच्या टीममध्ये संधी मिळाली. जोफ्रा आर्चर आणि क्रिस जॉर्डन सध्या आयपीएल खेळत आहेत.
भारताचे इतक खेळाडूही काऊंटी खेळणार
ईशांत शर्माबरोबरच चेतेश्वर पुजारालाही आयपीएलमध्ये कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही. त्यामुळे पुजाराही काऊंटी खेळायला गेला आहे. आयपीएल संपल्यावर विराट कोहलीही इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी खेळणार आहे. आयपीएलनंतर भारताचे इतर खेळाडूही इंग्लंडमध्ये जातील असं बीसीसीआयनं सांगितलं आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारत एकही सराव सामना खेळला नाही. दक्षिण आफ्रिकेतल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला. पुरेसा सराव न मिळाल्यामुळे भारताचा पराभव झाल्याची टीका यावेळी झाली होती. दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेली ही चूक सुधारण्यासाठी भारतीय टीममधले खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये जाऊन सराव करत आहेत.