अश्विनवर टीका केलेल्या हरभजनला फारुक इंजिनियरनी सुनावलं
भारताचे माजी विकेट कीपर फारुक इंजिनिअर यांनी अश्विनवर टीका करणाऱ्या हरभजन सिंगला सुनावलं आहे.
मुंबई : भारताचे माजी विकेट कीपर फारुक इंजिनिअर यांनी अश्विनवर टीका करणाऱ्या हरभजन सिंगला सुनावलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये अश्विननं केलेल्या कामगिरीवर हरभजननं वक्तव्य केलं होतं. त्यावर इंजिनिअर यांनी प्रतिक्रिया दिली. ''हरभजन सिंग याचं वक्तव्य तुम्ही वाचलं का? ते वक्तव्य करायची काहीही गरज नव्हती. पहिला स्पिनर आणि दुसरा स्पिनर म्हणजे काय असतं?'' असा सवाल इंजिनिअर यांनी उपस्थित केला. क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये लिजंड्स क्लबकडून एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रामध्ये इंजिनिअर उपस्थित होते.
''अश्विन हा महान बॉलर आहे. पण हरभजनननं त्याच्यावर टीका केल्याचं मला वाटलं. तुम्ही खराब कपडे रस्त्यावर धूत नाही. जेव्हा ऑफ स्पिनर म्हणून अश्विननं भारतीय टीममध्ये हरभजनची जागा घेतलेली असते. हे म्हणजे धोनीनं पंतवर टीका करण्यासारखं आहे. हे क्रिकेट नाही'', असं इंजिनिअर म्हणाले.
''भारतीय टीमला गरज असताना अश्विनला दुखापत झाली आणि कुलदीप यादवला संधी मिळाली. सिडनीमध्ये झालेल्या शेवटच्या टेस्टमध्ये कुलदीपनं शानदार बॉलिंग करत एका इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ५ विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे कुलदीपला कोणत्याही टेस्ट सीरिजसाठी पहिला स्पिनर म्हणून पसंती देण्यात यावी. यानंतर डावखुरा बॉलर जडेजाला प्राधान्य देण्यात यावं'', असं मत हरभजननं व्यक्त केलं होतं.
''या कामगिरीमुळे तुम्ही कुलदीप आणि जडेजाला भारतातच नाही तर परदेशातही एकत्र खेळवू शकता. अश्विनला दोन परदेश दौऱ्यांमध्ये दुखापत झाल्यामुळे मॅचना मुकावं लागलं. जेव्हा टीमला तुमची गरज होती, तेव्हा तुम्हाला दुखापत झाली. त्यामुळे आता कुलदीप ही भारतीय टीमची स्पिनर म्हणून पहिली पसंती आणि जडेजा दुसरी पसंती असावी'', असं हरभजन म्हणाला.
''मॅच जिंकवून देणाऱ्या खेळाडूंना तुम्ही टीममध्ये घेतलं पाहिजे. परदेशात ते मॅच जिंकवण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. त्यामुळे मलई खायची वेळ येते, तेव्हा दुसराच कोणीतरी खाऊन जातो'', असं वक्तव्य हरभजननं केलं होतं.