Rohit Sharma: टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिला सामना जिंकला. आयरलँडविरूद्धचा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला. दरम्यान टी-20 वर्ल्डकप सुरु असताना रोहित शर्माने एक वनडे वर्ल्डकपबाबत एक मोठं विधान केलं आहे. रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, फायनल सामना गमावला हे समजायला रोहित शर्माला 2-3 दिवस लागले होते. 19 नोव्हेंबर 2023 रोजी वनडे वर्ल्डकपची फायनल रंगली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारताचा पराभव केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एडिडासशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ज्यावेळी मी वर्ल्डकप फायनलनंतर दुसऱ्या दिवशी झोपेतून उठलो, तेव्हा मला अजिबात माहिती नव्हतं की, गेल्या रात्री नेमकं काय घडलं. मी माझ्या पत्नीसोबत याविषयी चर्चा करत होतो आणि तिला विचारलं की, गेल्या रात्री जे घडलं ते एक वाईट स्वप्न होतं का? वर्ल्डकप फायनल उद्या आहे ना? वर्ल्डकपमध्ये झालेला पराभव समजण्यासाठी मला 2-3 दिवस लागले होते. आणि अजून एका संधीसाठी तब्बल 4 वर्ष बाकी आहेत. 


आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 च्या विजयाची टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात होती. यावेळी अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन टीमचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली होती. त्यावेळी त्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताला 240 रन्सवर रोखलं होतं. 



या सामन्यात विराट कोहलीने 63 बॉल्समध्ये 54 रन्स बनवले होते. याशिवाय कर्णधार रोहित शर्मा 31 बॉल्समध्ये 47 रन्स करून बाद झाला होता. टीम इंडियाने दिलेल्या 241 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या टीमने 3 विकेट्स गमावून वर्ल्डकपवर पाचव्यांदा नाव कोरलं होतं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून खरा हिरो ट्रेविस हेड ठरला होता.