James Anderson will retire from Test cricket : खूप कमी क्रिकेटर खूप वर्ष खेळतात पण खूप वर्ष खेळताना मॅचविनर होणं फारच कमी लोकांना जमतं. असाच एक अवलिया म्हणजे जेम्स अँडरसन. खेळाडू म्हणून उतरत्या वयात देखील तिच स्पीड अन् तिच अॅक्युरसी.. कसोटी क्रिकेटचा सर्वात घातक गोलंदाज म्हणून जेम्स अँडरसनकडे पाहिलं जात होतं. अशातच आता टेस्ट क्रिकेटचा हाच अवलिया आता निवृत्ती (James Anderson Test Retirement) घेतोय. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्याशी चर्चा केल्यानंतर इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. इंग्लंड संघाच्या भविष्यासाठी हा निर्णय घेणार असल्याचं बोललं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल सुरू असताना मॅक्युलमने अलीकडेच अँडरसनची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. गोल्फच्या एका फेरीत अँडरसनने कोच मॅक्युलमला वैयक्तिकरित्या निवृत्तीबद्दल विचारणा केली. कसोटी संघाच्या भविष्याकडे पाहून त्याची विक्रमी आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवण्याची वेळ येऊ शकते, असं अँडरसनने मॅक्युलमला म्हटलं आहे. अँडरसनने नुकतंच भारताविरुद्ध खेळताना विक्रम रचला होता. अँडरसनने मार्चमध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी कसोटीत 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला.


इंग्लंडचा संघ टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध सहा कसोटी सामने खेळणार आहे. ही कसोटी मालिका अँडरसनसाठी अखेरची ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतर अँडरसन टेस्ट क्रिकेटला अलविदा करेल. 2025-26 च्या हिवाळ्यात पुढील ऍशेस मालिकेसाठी नवा गोलंदाज तयार व्हावा, यासाठी अँडरसन निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशी माहिती द गार्डियनने दिली आहे.


दरम्यान, वय वर्ष 43 असताना देखील अँडरसनच्या विकेट्स भूक कधी कमी झाली नाही. इंग्लंड असो वा वेस्ट इंडिज, कोणत्याही मैदानात अँडरची स्पीड काही कमी झाली नाही. ना कधी थकला ना थांबला. धावत राहिला अन् खोऱ्याने विकेट्स नावावर करत गेला. ढेरी घेऊन फिरणाऱ्या विशीतल्या तरुणाला देखील लाजवेल, अशी अँडरसनची फिटनेस.. अनेक खेळाडू चाळीशीत आले की पायाला पट्टया लावून फिरतात. मात्र, रखरखत्या उन्हात फलंदाजांचे दांडके मोडण्याची ताकद आहे ती फक्त जेम्स अँडरसनकडेच..!