माऊंट मॉनगनुई : भारताविरुद्धची वनडे सीरिज गमवाल्यानंतर उरलेल्या २ वनडे मॅचसाठी न्यूझीलंडनं त्यांच्या टीममध्ये बदल केले आहेत. ईश सोदी आणि डग ब्रेसवेलला न्यूझीलंडनं टीमबाहेर केलं आहे. या दोघांच्याऐवजी टीममध्ये जेम्स नीशम आणि टॉड ऍश्ले यांची निवड करण्यात आली आहे. या सीरिजची चौथी वनडे ३१ जानेवारी आणि पाचवी वनडे ३ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये भारताकडे ३-०ची विजयी आघाडी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ वर्षांचा ईश सोदी हा न्यूझीलंडचा लेग स्पिनर आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये सोदीला अंतिम-११ खेळाडूंमध्ये स्थान मिळालं होतं. पण त्याला या दोन्ही मॅचमध्ये चमक दाखवता आली नाही. २८ वर्षांच्या डग ब्रेसवेलला ऑलराऊंडर म्हणून खेळवण्यात आलं होतं. सीरिजच्या ३ मॅचमध्ये ब्रेसवेलला एकच विकेट घेता आली. दुसऱ्या वनडेमध्ये ब्रेसवेलनं अर्धशतकही केलं होतं.


ईश आणि ब्रेसवेलऐवजी नीशम आणि ऍश्लेची निवड झाल्याची माहिती न्यूझीलंड टीमच्या निवड समितीचे सदस्य गेव्हिन लार्सेन यांनी सांगितलं. हे दोन्ही खेळाडू चांगली कामगिरी करून न्यूझीलंडला जिंकवतील, अशी अपेक्षा लार्सेन यांनी व्यक्त केली. जेम्स नीशम श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजवेळी न्यूझीलंड टीममध्ये होता, पण मांडीला दुखापत झाल्यामुळे त्याला टीमबाहेर जावं लागलं होतं.


भारतानंही त्यांच्या शेवटच्या २ वनडेमध्ये बदल केले आहेत. लागोपाठच्या क्रिकेटमुळे कर्णधार विराट कोहलीला विश्रांती द्यायचा निर्णय भारतीय टीम प्रशासन, निवड समिती आणि बीसीसीआयनं घेतला आहे. शेवटच्या २ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी विराटला विश्रांती देण्यात आली आहे. विराटऐवजी रोहित शर्माकडे भारतीय टीमचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. तर विराट कोहलीऐवजी तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिलला संधी दिली जाऊ शकते. 


भारतीय टीम


रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, अंबाती रायुडू, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, मोहम्मद सीराज, खलील अहमद


न्यूझीलंड टीम


केन विलियमसन (कर्णधार), टॉड ऍश्ले, ट्रेन्ट बोल्ट, कॉलिन डी ग्रॅण्डहोम, लॉकी फरग्युसन, मार्टीन गप्टील, मॅट हेन्री, टॉम लेथम (विकेट कीपर), कॉलीन मुनरो, जेम्स नीशम, हेन्री निकोल्स, मिचेल सॅण्टनर, टीम साऊदी, रॉस टेलर