बुमराहची बॉलिंग शैली धोकादायक, दुखापतीचा धोका जास्त
बुमराहला त्याच्या बॉलिंग शैलीमुळे भविष्यात समस्या उद्भवण्याची शक्यता आहे
मोहाली : बुमराहला त्याच्या बॉलिंग शैलीमुळे भविष्यात समस्या उद्भवण्याची शक्यता आहे, अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बुमराह हा सध्या भारतीय टीममधील प्रमुख बॉलरपैकी एक आहे. तज्ज्ञांनुसार बुमराहला त्याच्या बॉलिंग शैलीमुळे दुखापतीला सामोर जावे लागू शकते. बुमराह ज्याप्रकारे बॉलिंग करतो, अशा बॉलिंग शैलीमुळे त्याला पाठीच्या खालच्या भागात इजा होऊ शकते, अशी शक्यता शरीर क्रिया विज्ञानाचे प्राध्यापक डॉ. सायमन फेरोस यांनी केली आहे.
सायमन फेरोस आणि प्रसिद्ध फिजिओथेरेपिस्ट जॉन ग्लोस्टर हे दोघे ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया स्थित डिकीन विद्यापीठातील क्रीडा विभागाचे सदस्य आहेत. या दोघांनी बुमराहच्या बॉ़लिंग शैलीचा अभ्यास केला आहे. जॉन ग्लोस्टर हे गेल्या १७ वर्षांपासून आंतराराष्ट्रीय क्रिकेट मध्ये कार्यरत आहे. त्यांना फिजिओथेरेपिस्ट क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. तसेच त्यांनी साडे तीन वर्ष भारतीय टीमसाठी फिजिओथेरेपिस्ट म्हणून काम पाहिले आहे.
बुमराह नेहमी फ्रंट फुटवर बॉलचा टप्पा टाकतो. याचाच अर्थ असा की, तो बॉलवर अधिक दाब देतो. साधारणपणे अशा बॉलिंगमुळे उजव्या हाताने बॅटिंग करणाऱ्या बॅट्समॅनना चांगल्या प्रकारे इन स्विंग बॉल टाकून चकवा देता येतो. बुमराहची अशा प्रकारची बॉलिंग ४५ अंश कोन या प्रकारात मोडते. बुमराह अशा प्रकारची बॉलिंग काही वेळेस करतो. या बॉलिंगमुळे बुमराहला भविष्यात पाठीच्या कण्यामधील खालील भागात दुखापत होऊ शकते, अशी शक्यता सायमन फेरोस यांनी वर्तवली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये जास्त काळापर्यंत दुखापत न होता बुमराह खेळू शकत नाही, असे काही जणांना वाटते. बुमराहच्या बॉलिंग शैलीमुळे एकाच प्रकारचा बॉल विशेष करुन त्याला यॉर्कर बॉल टाकण्यास सोपे पडते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लसिथ मलिंगा हा यशस्वी झाला. त्या मागचे कारण त्याची अनोखी बॉलिंग शैली आहे, असे जॉन ग्लोस्टर यांनी सांगितले.
बुमराहच्या बॉलिंगचे विश्लेषण करताना जॉन ग्लोस्टर म्हणाले की, बुमराहची शरीरयष्टी ही एखाद्या यंत्रासारखी आहे. बुमराहच्या बॉलिंग शैलीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करण्याबद्दल बुमराहच्या प्रशिक्षकांची जॉन ग्लोस्टर यांनी प्रशंसा देखील केली. एकूण ५५ सीरिजमध्ये प्रमुख फिजीओथेरीपीस्ट म्हणून जॉन ग्लोस्टर यांनी काम पाहिले आहे.