INDvsAUS: टेस्टमधला नंबर १ बॉलर म्हणतो; म्हणून बुमराह धोकादायक!
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या टी-२० सीरिज सुरू आहे.
बंगळुरू : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या टी-२० सीरिज सुरू आहे. पहिल्या टी-२०मध्ये भारताचा शेवटच्या बॉलला निसटता पराभव झाला. भारतानं ठेवलेल्या १२७ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आले. भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहनं टाकलेल्या शानदार स्पेलमुळे ऑस्ट्रेलियाला शेवटच्या बॉलवर विजय मिळाला. बुमराहनं ४ ओव्हरमध्ये फक्त १६ रन देऊन ३ विकेट घेतल्या. शेवटच्या २ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६ रनची आवश्यकता होती. पण बुमराहनं १९व्या ओव्हरमध्ये फक्त २ रन देऊन २ विकेट घेतल्या. बुमराहच्या या भेदक बॉलिंगमुळे ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १४ रनची आवश्यकता होती. पण उमेश यादवला हे आव्हान रोखता आलं नाही आणि भारताचा पराभव झाला.
टेस्ट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सनं जसप्रीत बुमराहचं कौतुक केलं आहे. जसप्रीत बुमराह हा सगळ्यात धोकादायक बॉलर असल्याचं कमिन्स म्हणाला आहे. 'बुमराह हा उच्च स्तरीय खेळाडू आहे. तो जलद आणि अचूक बॉलिंग करू शकतो. तसंच त्याच्याकडे असलेला स्लो बॉलही चांगला आहे. त्यामुळे बुमराह बॅट्समनपुढे आव्हान उभं करतो. बुमराह डोक्यानं क्रिकेट खेळतो. तो त्याच्या योजनांची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करतो. बुमराहनं तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे', अशी प्रतिक्रिया कमिन्सनं दिली.
'माझ्या खेळाबद्दल खुश आहे. लागोपाठ चांगलं क्रिकेट खेळल्यामुळे मला मदत झाली आहे. पांढऱ्या बॉलनं मी जास्त क्रिकेट खेळलेलो नाही. त्यामुळे जास्त मॅच खेळण्यासाठी मी उत्सुक आहे,' असं वक्तव्य कमिन्सनं केलं.
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात कमिन्सनही योगदान दिलं. पण तो स्वत:ला अजूनही बॅट्समन मानत नाही. 'माझी टीममधली भूमिका स्वत:ची विकेट वाचवणं आणि जास्त वेळ बॅटिंग करणं एवढी आहे. दुसऱ्या बाजूला असलेला चांगला बॅट्समन याचा फायदा घेईल, प्रामुख्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये एवढीच माझी अपेक्षा असते,' असं कमिन्सनं सांगितलं.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधली दुसरी आणि शेवटची टी-२० बंगळुरूमध्ये खेळवली जाईल. या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला तर सीरिजही त्यांच्या खिशात जाईल. ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा विजय असेल, असं कमिन्सला वाटतं. पहिल्या टी-२०मध्ये विशाखापट्टणमची खेळपट्टी बॉलरना अनुकूल होती. पण बंगळुरूच्या खेळपट्टीवर बॅट्समनना मदत होऊन मोठा स्कोअर होईल, असं भाकीत कमिन्सनं वर्तवलं आहे.