BCCI secretary Jay Shah About Jasprit Bumrah:  भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज जायबंदी झाल्याने वेस्ट इंडिजचा दौरा अर्ध्यात सोडून मायदेशी परतला आहे. त्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजीबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच भारतीय संघाला मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमधून पूर्णपणे सावरला आहे. जसप्रीत बुमराहची आयर्लंड दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता या वृत्ताला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनीच दुजोरा दिला आहे. गुरुवारी नवी दिल्लीमध्ये झालेल्या बासीसीआयच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. जय शाह यांनी 2023 च्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेच्या नियोजित वेळापत्रकामध्ये काही बदल होणार असल्याचंही सांगितलं. अनेक देशांनी वेगवेगळ्या कारणांमुळे केलेल्या विनंतीचा मान ठेऊन हे बदल केले जाणार असल्याचं शाह म्हणाले. 


जय शाह नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"बुमराह हा पूर्णपणे ठणठणीत आहे. तो आयर्लंड दौऱ्यावर जाऊ शकतो," असं जय शाह यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये सांगितलं. मागील 11 महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानातून दूर असलेला बुमराह आयर्लंड दौऱ्यात संघाचा भाग असू शकतो. बुमराह विश्रांतीला जाण्यापूर्वी त्याचा शेवटचा सामना मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळला होता. 


अनेक मालिका, स्पर्धा हुकल्या


बुमराहच्या पाठीला दुखापत झाल्याने त्याने विश्रांती घेतली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेला टी-20 वर्ल्डकप, बांगलादेश मालिकेबरोबरच त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्याचीही संधी या दुखापतीमुळे गमावली. तसेच बुमराह 2023 चं आयपीएलचं पर्वही खेळला नाही. बुमराह मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आयपीएल खेळतो मात्र या वर्षी तो एकही सामना खेळला नाही.


पाठीवर शस्त्रक्रीया अन् क्रिकेट अकादमीत सराव


बुमराहच्या पाठीवर मार्च महिन्यामध्ये शस्त्रक्रीया झाली. त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. बंगळुरुमधील या अकदामीमध्ये बुमराहबरोबरच दुखापतग्रस्त के. एल. राहुल, प्रसिद्ध कृष्णा आणि ऋषभ पंत हे सुद्धा सराव करत आहेत. राष्ट्रीय क्रिकेट अकदामीमधील आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर आशिया चषक स्पर्धेतील संघामध्ये बुमराहचा समावेश केला जाईल असं सांगितलं जात आहे. आशिया चषक स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरु होत आहे. ही स्पर्धा श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. त्यापूर्वी होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यामध्ये बुमराह मैदानात दिसेल अशी दाट शक्यता आहे.


या आठवड्याच्या शेवटी घोषणेची शक्यता


भारतीय संघ 18 ऑगस्टपासून आयर्लंडविरोधात मालिकेला प्रारंभ करणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सध्या एकदिवसीय मालिका सुरु असून या दौऱ्यात टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे. टी-20 चा शेवटचा सामना 13 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा या आठवड्याच्या शेवटी होईल असं सांगितलं जात आहे.