नवी दिल्ली : आयसीसीने वन-डे रँकिंगची यादी जाहीर केली आहे. बॅट्सममनच्या यादीत ९०९ गुणांसह विराट कोहली अव्वलस्थानी पोहोचला आहे. तर, जसप्रीत बुमराहनेही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात जसप्रित बुमराह याने आठ विकेट्स घेतल्यानंतर बॉलर्सच्या यादीत अव्वल स्थान मिळवलं आहे. मात्र, अफगाणिस्तान टीमचा स्टार स्पिनर राशिद खान आणि टीम इंडियाचा जसप्रीत बुमराह या दोघांचे सध्या ७८७ गुण आहेत. त्यामुळे दोघांनाही प्रथम क्रमांक शेअर करावा लागत आहे.


बुमराहने ७५५ दिवसांत केला करिश्मा 


टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह याने आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये ७८७ गुण मिळवत अव्वल स्थान गाठलं आहे. ७५५ दिवसांत बुमराहने अव्वल स्थान मिळवलं आहे.


वन-डे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक गाठण्यासाठी अनेक दिग्गजांना यापेक्षा अधिक वेळ लागला आहे. मात्र, बुमराहने ७५५ दिवसांत हा कारनामा केला आहे.


जडेजाने केलेल्या अर्ध्यावेळात केली कमाल


जसप्रीत बुमराहने नंबर १ चं स्थान गाठत अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. बुमराहने हा कारनामा करताना रवींद्र जडेजाचा रेकॉर्ड तोडला आहे. रवींद्र जडेजाने १६३५ दिवसांत अव्वल क्रमांक मिळवला होता. तर, बुमराहने ७५५ दिवसांत नंबर १ मिळवला आहे.



कपिल-कुंबले यांनाही टाकलं मागे


या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मनिंदर सिंह यांचं नाव आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७९७ दिवसांत हा कारनामा केला होता. चौथ्या क्रमांकावर अनिल कुंबळे होता त्याने नंबर १ चा मुकुट मिळवण्यासाठी २३८७ दिवसांचा कालावधी लागला. तर, कपिल देव यांनी ३८१२ दिवसांत नंबर १ गाठला होता.