जोहान्सबर्ग : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगातले बहुतेक देश सध्या लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमध्ये सगळ्याच क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. क्रिकेटही याला अपवाद नाही, त्यामुळे अनेक क्रिकेटपटू व्हिडिओच्या माध्यमांमधून एकमेकांशी संवाद साधत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर शेन पॉलोक यानेही स्काय स्पोर्ट्स पॉडकास्टच्या माध्यमातून मायकल होल्डिंग आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्याशी संवाद साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

९० च्या दशकात भारताचा फास्ट बॉलर जवागल श्रीनाथ याच्यावर अन्याय झाला. श्रीनाथला त्याच्या कामगिरीचं श्रेय मिळालं नाही, असं पोलॉक म्हणाला. श्रीनाथने १९९१ ते २००३ दरम्यान ६७ टेस्टमध्ये २३६ विकेट आणि २२९ वनडेमध्ये ३१५ विकेट घेतल्या.


'मी जेव्हा क्रिकेट खेळत होतो, तेव्हा फास्ट बॉलरच्या अनेक शानदार जोड्या होत्या. यामध्ये पाकिस्तानचे वसीम अक्रम-वकार युनूस, वेस्ट इंडिजचे कर्टली एम्ब्रोज-कर्टनी वॉल्श, ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅक्ग्रा-ब्रेट ली यांचा समावेश होता. सध्या जेम्स अंडरसन-स्टुअर्ट ब्रॉड असे बॉलर आहेत. मला वाटतं भारताच्या जवागल श्रीनाथला त्याच्या कामगिरीचं श्रेय मिळालं नाही,' अशी प्रतिक्रिया पोलॉकने दिली.


दक्षिण आफ्रिकेसाठी खेळताना शेन पोलॉकने १०८ टेस्टमध्ये ४०० पेक्षा जास्त विकेट आणि ३,७०० रन केले. २००८ साली पोलॉकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. शेन पोलॉकनं आपल्याच देशाच्या डेल स्टेनचंही कौतुक केलं. स्टेनने पोलॉकचं दक्षिण आफ्रिकेसाठी टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचं रेकॉर्ड मोडलं. स्टेनची बॉलिंग एक्शन शानदार आहे. सपाट खेळपट्ट्यांवरही स्टेन धोकादायक आहे, असं पोलॉक म्हणाला.