Indian Cricket Team :  आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही. रोहित शर्माने (Rohit Sharma) वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे आता त्याला आणखी संधी दिली जाईल का? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर आता बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले जय शहा?


रोहित शर्मावर आता खुलासा करण्याची गरज आहे का? जूनमध्ये टी-20 विश्वचषक सुरू होत आहे. त्याआधी आमची आयपीएल आणि अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका आहे. बीसीसीआयच्या स्वत:च्या जमिनीवर बांधले जाणारे नवे एनसीए पुढील वर्षी ऑगस्टपासून कामाला सुरुवात करेल, असं जय शहा यांनी (Jay Shah On Rohit Sharma) रोहितबद्दल बोलताना म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतरच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्याच्या संघाच्या कार्यकाळाचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असं जय शहा यांनी सांगितलं आहे.


आम्ही त्यांचा कार्यकाळ वाढवला आहे पण अद्याप करार निश्चित केलेला नाही. आमच्याकडे अजिबात वेळ नव्हता. माझी द्रविड आणि सपोर्ट स्टाफसोबत बैठक झाली आणि आम्ही परस्पर संमतीने कार्यकाळ वाढवण्यास सहमती दर्शवली. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर आम्ही पुन्हा भेटू आणि याबाबत निर्णय घेऊ, असं वक्तव्य जय शहा यांनी केलं आहे.


हार्दिक पांड्या कधी खेळणार?


वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआय सचिव जय शाहच्या हवाल्याने सांगितलंय की, "हार्दिक पांड्या जानेवारीत अफगाणिस्तान टी-20 मालिकेसाठी तंदुरुस्त असू शकतो." बांगलादेश विरुद्धच्या विश्वचषक 2023 च्या सामन्यात घोट्याच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेलेला हार्दिक पंड्या बाहेर पडला होता. त्यानंतर तो आता थेट अफगाणिस्ताविरुद्ध खेळताना दिसू शकतो.


कसं आहे IND vs AFG चं वेळापत्रक ?


तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहाली येथे खेळवला जाईल, तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 14 आणि 17 जानेवारीला इंदूर आणि बंगळुरूमध्ये खेळवला जाईल.