वर्षभरात एकही मॅच खेळले नाही तरी १ कोटींचा करार
बीसीसीआयनं खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे.
मुंबई : बीसीसीआयनं खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे. यंदा बीसीसीआयनं ४ ग्रेडिंग सिस्टिम ठेवल्या आहेत. ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार ग्रेडिंग सिस्टिममधल्या खेळाडूंना ७ कोटी रुपये, ५ कोटी रुपये, ३ कोटी रुपये आणि १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
बीसीसीआयनं करार केलेले काही खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहेत तर काही फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळतात. पण करार करण्यात आलेले दोन खेळाडू मागच्या एका वर्षामध्ये एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळले नाहीत. जयंत यादव आणि करुण नायर या दोन खेळाडूंसोबत बीसीसीआयनं ग्रेड सी प्रमाणे करार केला आहे. या करारानुसार दोघांनाही वर्षभरासाठी १ कोटी रुपये मिळाले आहेत. पण मागच्या वर्षभरात हे दोन्ही खेळाडू एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या नाहीत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी २०१७ मध्ये पुण्यात झालेली टेस्ट ही जयंत यादवची शेवटची टेस्ट होती. ४ टेस्टमध्ये जयंत यादवनं ४५.६०च्या सरासरीनं २२८ रन्स केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. या ४ टेस्टमध्ये ११ विकेट घेण्यातही जयंत यादवला यश आलं. तर ऑक्टोबर २०१६ साली जयंत यादव झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव वनडे खेळला.
जयंत यादव प्रमाणेच करुण नायरलाही बीसीसीआयनं सी ग्रेडमध्ये ठेवलं आहे. करुण नायरनं ६ टेस्टमध्ये ६२.३३ च्या सरासरीनं ३७४ रन्स केल्या. यातल्या ३०३ रन्स करुण नायरनं या एकाच इनिंगमध्ये केल्या होत्या. सेहवागनंतर टेस्ट मॅचमध्ये त्रिशतक करणारा नायर हा दुसरा भारतीय आहे. करुण नायर शेवटची टेस्ट मार्च २०१७ मध्ये खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशालामध्ये झालेल्या टेस्टनंतर नायरला टीममध्ये संधी मिळाली नाही. तर करुण नायर भारताकडून २ वनडे खेळला. या दोन्ही वनडे झिम्बाब्वेविरुद्ध जून २०१६ मध्ये झाल्या होत्या.
ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीसाठी खेळाडूंना ही रक्कम देण्यात येणार आहे. म्हणजेच या करारापासूनच्या कालावधीपासून हे दोन्ही खेळाडू भारताकडून एकही मॅच खेळले नाहीत तरीही त्यांच्यासोबत बीसीसीआयनं करार केला आहे.
खेळाडूंची ग्रेडिंग सिस्टिम
ग्रेड ए प्लस (७ कोटी रुपये)
विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह
ग्रेड ए (५ कोटी रुपये)
अश्विन, रविंद्र जडेजा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, एम.एस.धोनी, वृद्धीमान सहा
ग्रेड बी (३ कोटी रुपये)
के.एल.राहुल, उमेश यादव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, दिनेश कार्तिक
ग्रेड सी (१ कोटी रुपये)
केदार जाधव, मनिष पांडे, अक्सर पटेल, करुण नायर, सुरेश रैना, पार्थिव पटेल, जयंत यादव