IPL 2022 : डेब्यू करणाऱ्या खेळाडूने मागितला रिव्ह्यू, धोनीही पाहत बसला मात्र...
यंदाच्या सिझनमधील चेन्नईचा सलग तिसरा पराभव झाला आहे.
मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी खेळलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज सामन्यात चेन्नईचा पराभव झाला आहे. यंदाच्या सिझनमधील चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव होता. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना चेन्नईची टीम अवघ्या 126 रन्समध्ये ऑलआऊट झाली. यामुळे अवघ्या 54 रन्सने पंजाब किंग्जने हा सामना जिंकला. दरम्यान पंजाबसाठी जितेश शर्मा खरा विजयाचा शिल्पकार ठरला आहे.
चेन्नईची कालच्या सामन्यात सुरुवात फार खराब झाली. केवळ 36 रन्सवर त्यांची अर्धी टीम पव्हेलियनमध्ये परतली होती. ज्यामुळे जिंकण्यासाठी पुन्हा कमबॅक करणं फार कठीण झालं होतं.
जितेशने मागितला उत्तम रिव्ह्यू
पंजाब किंग्जकडून काल विकेटकीपर फलंदाज जितेश शर्माने डेब्यू केलं. या सामन्यात त्याने उत्तम फलंदाजी केली. यानंतर लगेच विकेटकिपींग करताना त्याच्या एका निर्णयाने टीमने विजयाचा रस्ता धरला. त्यावेळी महेंद्रसिंग धोनी क्रिजवर उभा होता.
17.1 ओव्हरमध्ये राहुल चाहरच्या गोलंदाजीवर धोनीने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी बॉल थेट विकेटकीपर जितेशच्या हातात गेला. जितेशने तो कॅच पकडला मात्र अपील करूनही अंपायरने नॉट आऊट दिलं. ज्यानंतर जितेशने तातडीने रिव्ह्यू घेण्याचा इशारा केला आणि कर्णधार मयांक अग्रवालने रिव्ह्यू घेतला.
यावेळी क्रिजवर उभा असलेला धोनीही संभ्रमात होता. मात्र रिप्लेमध्ये धोनीच्या बॅटला बॅट लागल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. अशा परिस्थितीत अंपायरने धोनीला आऊट दिलं आणि ही विकेट पडताच चेन्नईचा पराभव झाला.