मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा `हा` विक्रम इंग्लंडचा जो रूट मोडणार! माजी कर्णधाराने केला दावा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याच्या विक्रमाची बरोबरी करणं आजही क्रिकेटपटूंना कठीण आहे.
मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याच्या विक्रमाची बरोबरी करणं आजही क्रिकेटपटूंना कठीण आहे. मात्र आता सचिन तेंडुलकर यांचा कसोटीतील विक्रम इंग्लंडचा क्रिकेटपटू जो रूट मोडेल असा दावा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर यांनी केला आहे. रुटचा फॉर्म, फिटनेस आणि वय पाहता सचिनचा विक्रम मोडीत निघेल, असं मार्क टेलर यांनी सांगितलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रूटने 10 हजार धावांचा पल्ला गाठला. सचिन तेंडुलकर यांनी कसोटी सामन्यात 15921 धावा केल्या आहेत.
"रूट गेल्या 18 महिन्यांपासून जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काळ आहे. त्याचा फिटनेस आणि फॉर्म असाच कायम राहिला तर लवकरच तो कसोटीत 15 हजार धावा करेल, यात दुमत नाही", असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर यांनी सांगितलं आहे. जो रूट याचं वय आता 31 वर्षे असून अजून 5-6 वर्षे क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडेल, असा दावा मार्क टेलर यांनी केला आहे. फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी जो रूटने कर्णधारपद अष्टपैलू बेन स्टोक्स याच्याकडे सोपवलं आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेत जो रूटचा फॉर्म पाहता यूनिस खान आणि सुनिल गावस्कर यांना मागे टाकेल, असं दिसत आहे. युनिस खानच्या नावावर 10099 आणि सुनिल गावस्कर यांच्या नावावर 10122 धावा आहे. यानंतर जो रुट स्टीव वॉचा विक्रम देखील मोडू शकतो. स्टीव वॉच्या नावावर 10927 धावा आहे. पण न्यूझीलंड विरुध्दच्या उर्वरित 3 सामन्यात शक्य नाही.