`टीम इंडियाच्या फिल्डिंग प्रशिक्षकपदासाठी नाकारलं कारण...`; जॉन्टी ऱ्होड्सचा खुलासा
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदसाठी जगातला सर्वोत्तम फिल्डर अशी ओळख असलेल्या जॉन्टी ऱ्होड्सचा अर्ज नाकारण्यात आला.
मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदसाठी जगातला सर्वोत्तम फिल्डर अशी ओळख असलेल्या जॉन्टी ऱ्होड्सचा अर्ज नाकारण्यात आला. टीम इंडियाने पुन्हा आर.श्रीधर यांचीच फिल्डिंग प्रशिक्षक म्हणून निवड केली. जॉन्टी ऱ्होड्सच्या अर्जाला आधीच केराची टोपली दाखवण्यात आली. मुलाखतीसाठीही जॉन्टीला बोलावलं नाही. अभय शर्मा आणि टी दिलीप हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते.
जॉन्टीचा अर्ज भारत-ए आणि नॅशनल क्रिकेट अकादमीच्या दर्जासाठी होता, अशी प्रतिक्रिया तेव्हाचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिली होती. यानंतर आता खुद्द जॉन्टी ऱ्होड्सने याबाबत खुलासा केला आहे. हे सांगताना ऱ्होड्सने बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.
'ते मला नो थॅंक्स म्हणाले,' असं उत्तर जॉन्टी ऱ्होड्सने एका ट्विटला दिलं. श्रीधर मागची २ वर्ष भारतीय टीमसोबत असल्याचा फायदा त्यांना झाला, असंही ऱ्होड्स म्हणाला.
जॉन्टी ऱ्होड्सची आयपीएलमध्ये पंजाबच्या फिल्डिंग प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. याआधी जॉन्टी ऱ्होड्स मुंबईचा प्रशिक्षकही होता. २९ मार्चपासून यंदाच्या आयपीएलला सुरुवात होणार आहे. गतविजेती मुंबई आणि चेन्नईमध्ये यंदाच्या मोसमाचा पहिला सामना होणार आहे.