K L Rahul Vs LSG Owner Sanjiv Goenka: भारतीय संघातील सलामीवीर के. एल. राहुल इंडियन प्रिमिअर लीगच्या पुढील म्हणजेच 2025 च्या पर्वामध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार नाही असं मानलं जात आहे. 2024 च्या पर्वामध्ये मैदानात के. एल. राहुल आणि संघाचे मालक संजीव गोयंका यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या संवाददरम्यान गोयंका के. एल. राहुलला झापत असल्यासारखं वाटतं होतं. मात्र आता अनेक महिन्यांनंतर या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आणि समोर संघमालक एवढं ओरडत असताना के. एल. राहुल असा शांतपणे का उभा होता याची माहिती या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीनेच दिली आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

8 मे रोजी झालेल्या सान्यात लखनऊच्या संघाचा सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून 10 विकेट्सने पराभव झालं. या पराभवानंतर तावातावत संजय गोयंका मैदानात आले आणि त्यांना कर्णधार के. एल. राहुलला काहीतरी सुनावलं. हा सारा प्रकार कॅमेरात कैद झाला आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यावर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या. संजय गोयंका यांनी प्रशिक्षक जस्टीन लँगरवरही आरडआरोड केली. मात्र फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले ते गोयंका राहुलवर ओरडत असणारे. यावरुन राहुलचे चाहते चांगलेच संतापले होते. त्याला संघात घेतलं म्हणजे तो काही संघ मालकांचा चाकर नाही इथपासून ते राहुलने जशास तसं उत्तर द्यायला पाहिजे होतं इथपर्यंत अनेक प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या. मात्र आता या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं आणि के. एल. राहुल एवढा शांत का उभा होता याचा खुलासा लखनऊच्या संघाचा खेळाडू कृष्णाप्पा गौतमने केला आहे. 


...म्हणून राहुल शांत होता


हैदराबादविरुद्धचा हा सामना खेळलेल्या लखनऊच्या कृष्णाप्पा गौतमने याच सामन्यात उत्तम गोलंदाजी केली होती. तो सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज ठरला होता. क्रिकट्रॅकरला दिलेल्या मुलाखतीमध्ये, कृष्णाप्पा गौतमने या पराभवानंतर मालक संजीव गोयंका चांगलेच नाराज झाले होते असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आपला संताप कर्णधारवर व्यक्त केला. त्यावेळी राहुल का शांत होता हे सागताना कृष्णाप्पा गौतमने, " ज्या पद्धतीने आम्ही सामना हारलो ते पाहता संघ मालक (संजीव गोयंका) थोडे निराश झाले होते. कोणतीही व्यक्ती असली तरी ती भावना व्यक्त करेल. हा भावनांचा चढ-उतार असतो. मात्र त्यावेळेस के. एल. राहुल हा त्याच्या नेहमीच्या पद्धतीने शांत होता. त्याने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्याने कोणाचीही बाजू घेतली नाही. त्याने संघ मालकाची बाजू घेतली नाही किंवा खेळाडूंची बाजू घेतली नाही. तो शांतपणे स्वत:ला संभाळत सर्वकाही ऐकून घेत होता. कारण त्याला ते (गोयंका) काय म्हणत आहेत हे समजून घेऊन त्यांना काय चुकलं हे समजावून सांगायचं होतं," असं म्हटलं. 


नक्की वाचा >> Root Vs Sachin: भारतीयाचा विक्रम मोडला जाऊ नये म्हणून BCCI चा कट? 'त्या' विधानाने खळबळ


त्यांना असं वाटत असेल की आम्ही...


संजीव गोयंका हे त्यावेळेस भावनेच्या भरात वाहत गेलेले असं कृष्णाप्पा गौतमने म्हणतानाच त्यांचं वागणंही त्याच्या दृष्टीकोनातून योग्य होतं, कारण त्यांनी संघासाठी फार वेळ आणि कष्ट केले आहेत. एवढी गुंतवणूक आणि वारंवार संघ पराभूत होत असल्याने ते भावनेच्या भरात बोलले असावेत, असं कृष्णाप्पा गौतमने म्हटलं आहे. "ते थोडं अतिरंजित झालं. मात्र ज्या व्यक्तीने एवढा वेळ आणि कष्टांची गुंतवणूक केली आहे त्याला आम्ही हे असं पराभूत होणं पहावलं नसेल. संघाप्रती त्यांचं प्रेम आणि पॅशन यामधून दिसून आलं असं मला वाटतं. आम्ही सर्व सामाने जिंकावेत आणि त्याचवेळी खेळाचा आनंदही घ्यावा असं त्यांचं मत आहे. मात्र पराभव झाल्याने ते निराश झाले आणि असे व्यक्त झाले," असं मत कृष्णाप्पा गौतमने नोंदवलं.