VIDEO: अश्विनच नाही या भारतीयानेही केलं होतं मंकडिंग, मैदानात झाला होता राडा
आयपीएलमध्ये राजस्थानचा बॅट्समन जॉस बटलरा पंजाबचा बॉलर आणि कर्णधार आर.अश्विनने मंकडिंग करून आऊट केलं.
मुंबई : आयपीएलमध्ये राजस्थानचा बॅट्समन जॉस बटलरा पंजाबचा बॉलर आणि कर्णधार आर.अश्विनने मंकडिंग करून आऊट केलं. आयपीएलच्या इतिहासात मंकडिंग पद्धतीने आऊट होणारा बटलर हा पहिला खेळाडू ठरला. अश्विनच्या अशाप्रकारे आऊट केल्यामुळे वादही निर्माण झाला आहे. बटलर त्यावेळी ४३ बॉलमध्ये ६९ रनवर खेळत होता. अश्विनने कोणतीही ताकीद न देता मंकडिंग करून बटलरला आऊट केलं. अश्विनने बॉल टाकायच्या आधीच नॉन स्ट्रायकरला उभा असलेला जॉस बटलर क्रिज सोडून पुढे गेला होता. याचा फायदा घेत अश्विनने बटलरला रन आऊट केलं.
क्रिकेटच्या नियमांप्रमाणे थर्ड अंपायरने बटलरला आऊट दिलं. पण अश्विनवर खेळ भावनेचा अनादर केल्याचा आरोप होऊ लागला. यादरम्यान बटलर आणि अश्विनमध्ये मैदानातच बाचाबाचीही झाली. २७ वर्षांपूर्वी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपील देव यांनीही अशाच प्रकारे मंकडिंग केलं होतं.
३ डिसेंबर १९९२ साली पोर्ट एलिजाबेथमधल्या वनडेदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या पीटर कर्स्टनला अशाप्रकारे आऊट केलं होतं. खरं तर अशा पद्धतीने आऊट करण्याआधी कपील देव यांनी कर्स्टनला ताकीदही दिली होती. तरीही कर्स्टनने बॉल टाकायच्या आधीच क्रिज सोडल्यामुळे कपील देव यांनी मंकडिंग करून त्याला आऊट केलं. यानंतर कर्स्टन रागातच पॅव्हेलियनमध्ये परतला. दक्षिण आफ्रिकेचा तेव्हाचा कर्णधार केपलर वेसल्सला हे आवडलं नाही. यानंतर दुसरी रन घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या वेसल्सनी त्याची बॅट फिरवली, यामध्ये कपील देवना दुखापत झाली. त्यावेळी मॅच रेफ्री नसल्यामुळे केपलर वेसल्सला कोणतीही शिक्षा झाली नाही.
मंकडिंग म्हणजे काय?
नॉन स्ट्रायकर एन्डला उभा असलेला बॅट्समन बॉलरने बॉल टाकण्याच्या आधीच जर क्रिजबाहेर येत असेल आणि बॉलरने जर त्याला रन आऊट केलं, तर त्याला मंकडिंग म्हणतात. भारतीय क्रिकेटपटू विनू मंकड यांनी सगळ्यात आधी १३ डिसेंबर १९४७ रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बिल ब्राऊन यांना अशा पद्धतीने आऊट केलं होतं. पण मंकड यांनी ब्राऊन यांना आऊट करण्याच्या आधी चेतावनी दिली होती.
सुनील गावसकर यांनी अशा प्रकारे आऊट होण्याला मंकडिंग का म्हणलं जातं असा सवालही विचारला आहे. 'बिल ब्राऊन आऊट झाला होता, मग याला मंकडिंग का म्हणायचं? ब्राऊंड का नाही?' असं गावसकर म्हणाले.