`...तर तुम्हाला किंमत चुकवावी लागेल`, कपिल देव यांची टीम इंडियाला वॉर्निंग!
Kapil Dev Warns Team India : दोन खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या स्पेशल वागणुकीवरून कपिल देव यांनी टीम इंडियाला खडे बोल सुनावले आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या यो-यो टेस्ट (Yo-Yo Test) झाल्या नाहीत. त्यावरून कपिल देव भडकल्याचं दिसून आलंय.
Asia Cup 2023 : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) आजही क्रिडाविश्वात अॅक्टिव आहेत. अनेक प्रश्नांवर कपिल देव आपलं मत रोखठोकपणे मांडताना दिसतात. अशातच आगामी आशिया कपपूर्वी (Asia Cup 2023) दुखापतीतून पूर्णपणे बरे झालेल्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन झाल्याने कपिल देव यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. मात्र, आता याच दोन खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या स्पेशल वागणुकीवरून कपिल देव यांनी टीम इंडियाला (Team India) खडे बोल सुनावले आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या यो-यो टेस्ट झाल्या नाहीत. त्यावरून कपिल देव भडकल्याचं दिसून आलंय.
भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपपूर्वी (World Cup 2023) प्रत्येक खेळाडूची कठोर चाचणी घेतली जावी, असं कपिल देव म्हणाले. आशिया कप हे खेळाडूच्या फिटनेसची चाचणी घेण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ आहे, असंही कपिल देव म्हणतात. आदर्शपणे प्रत्येक खेळाडूची फिटनेस चाचणी झाली पाहिजे. आतापर्यंत तुम्ही खेळाडूंना संधी दिली नाही. तुम्हाला वाटतं की तो थेट वर्ल्ड कपमध्ये खेळला, पण दुखापत झाली तर काय होईल? तुम्हाला किंमत चुकवावी लागेल, असं कपिल देव म्हणाले आहेत.
तुमच्या एका चुकीची शिक्षा संपूर्ण टीमला भोगावी लागेल. आशिया कपमध्ये प्रत्येकाला फलंदाजी आणि गोलंदाजीची संधी मिळेल. त्यामुळेच खेळाडूंना लय आणि आत्मविश्वास नक्कीच मिळेल. मात्र, वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली तर ती सर्वात वाईट गोष्ट असेल, असंही कपिल देव म्हणतात. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्याची गरज आहे. मात्र, त्याला फिट आहे हे सिद्ध देखील करावं लागेल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, टीम इंडियामध्ये टॅलेंटची कमतरता नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी तुमच्याकडे एक उत्तम टीम बनवण्याची तुम्हाला चांगली संधी आहे आणि त्यासाठी आशिया कप हे एक चांगलं व्यासपीठ आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला संधी मिळावी. यंदाचा वर्ल्ड कप हा भारतात होतोय, त्यामुळं आता तुम्ही टीम देखील मजबूत आणि फिट तयार ठेवा, असा सल्ला कपिल देव यांनी टीम इंडियाला दिला आहे.