मुंबई : मनातल्या गोष्टी थेट आणि स्पष्ट बोलण्यासाठी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली प्रसिद्ध आहे. दिनेश कार्तिक जेव्हा पहिल्यांदाच भारतीय टीममध्ये आला तेव्हा त्याच्यावरही गांगुलीने निशाणा साधला होता. युवराज सिंगने या आठवणीला उजाळा दिला आहे. यासाठी युवराजने दिनेश कार्तिकचा एक व्हिडिओही शेयर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरव कपूरशी बोलताना दिनेश कार्तिकने सौरव गांगुलीसोबत झालेल्या त्या घटनेबद्दल सांगितलं. 'त्या मॅचमध्ये मी राखीव खेळाडू होतो. खेळाडूंना पाणी देण्यासाठी मी धावत होतो, तेव्हा मी घसरलो आणि दादाच्या अंगावर पडलो. यानंतर दादा चिडला आणि कुठून आणता तुम्ही असे खेळाडू? कोण आहे हा?, असा प्रश्न दादाने विचारला,' असं कार्तिक म्हणाला.


युवराज सिंगने हा व्हिडिओ ट्विट केला केला आहे. 'कोण आहे हा वेडा? कुठून पकडून आणता? भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण सामन्यात सौरव गांगुलीचे हे शब्द होते,' असं युवराजने त्याच्या ट्विटमध्ये म्हणलं आहे.



पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा ३ विकेटने पराभव झाला होता. मोहम्मद युसूफने या मॅचमध्ये नाबाद ८१ रनची खेळी केली होती. तर इरफान पठाणने ९ ओव्हरमध्ये ३४ रन देऊन ३ विकेट घेतल्या होत्या. सौरव गांगुली आणि युवराज सिंग या मॅचमध्ये शून्यवर आऊट झाले होते.