BWF : किदांबी श्रीकांतने रचला इतिहास, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या किदाम्बी श्रीकांतने इतिहास रचला
मुंबई : BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या किदांबी श्रीकांतला अंतिम फेरीत सिंगापुरच्या लोह किन यूने पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे के श्रीकांतला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावणारा किदांबी श्रीकांत भारताचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे.
४३ मिनिटांपर्यंत चाललेला हा सामना श्रीकांतने १५-२१ आणि २०-२२ असा सरळ सेटमध्ये गमावला. माजी जागतिक नंबर वन श्रीकांत पहिल्या गेममध्ये 9-3 ने आघाडीवर होता. पण त्याचा प्रतिस्पर्धी सिंगापुरचा लोह किनने दणक्यात पुनरागमन केलं आणि पहिला सेट अवघ्या १६ मिनिटात जिंकला.
श्रीकांतने सामना गमावला
श्रीकांतने दुसऱ्या सेटमध्ये चांगला संघर्ष केला. पण लोक कीन यूने दमदार कामगिरी करत सेटबरोबरच सामनाही खिशात टाकला. याआधी सिंगापूरच्या या २४ वर्षीय खेळाडूने पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आणि ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसनचा पराभव केला होता. तर श्रीकांतने सेमी फायनलमध्ये भारताच्याच लक्ष्य सेनेवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली, जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारणारा श्रीकांत पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
लक्ष्य सेनला ब्राँझ
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने सेमीफायनलमध्ये लक्ष्य सेनविरुद्धच्या निर्णायक सामन्यात सलग पाच गुण मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. २८ वर्षीय श्रीकांतने अवघ्या एका तासात लक्ष्य सेनचा २१-१४, २१-१७ असा पराभव केला. लक्ष्य सेनला ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं.