केप टाऊन : भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये डावखुरा स्पिनर केशव महाराजची निवड करण्यात आली आहे. केशवचे वडिल आत्मानंद महाराजही क्रिकेटपटू होते. आफ्रिकेतल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आत्मानंद महाराज नटाल बी कडून खेळले होते. आत्मानंद महाराज विकेट कीपर होते. रंगभेदांच्या कारणामुळे आत्मानंद महाराज यांना आफ्रिकेकडून खेळता आलं नाही.


किरण मोरेंची भविष्यवाणी खरी ठरली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केशव महाराज लहान असतानाच भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांची भेट झाली होती. १९९२ साली दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेट खेळण्यासाठी असलेली बंदी उठवण्यात आली. यानंतर भारत हा आफ्रिका दौऱ्यावर जाणारा पहिलाच देश होता. यावेळी आत्मानंद महाराज यांनी प्रवीण आमरे, किरण मोरे, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांची भेट घेतली.


किरण मोरे यांच्यासोबत झालेल्या दुसऱ्या भेटीमध्ये आत्मानंद यांनी किरण मोरेंना घरी बोलावलं. आत्मानंद यांच्या विनंतीचा मान ठेवून किरण मोरेही महाराज यांच्या घरी गेले. याचवेळी किरण मोरे आणि केशव महाराज यांची भेट झाली. त्यावेळी केशव फक्त ३ वर्षांचा होता. आज केशवचं वय २७ वर्ष आहे. किरण मोरेबरोबर भेट झाल्यामुळेच केशव क्रिकेटपटू झाल्याची प्रतिक्रिया आत्मानंद महाराज यांनी दिली आहे.


२०१६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यात केशवची दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये निवड झाली होती. त्यावेळी आत्मानंद यांनी १९९२ साली काढलेला एक फोटो शेअर केला होता.


झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच झालेल्या चार दिवसीय टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये महाराजनं ५ विकेट घेतल्या होत्या. भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्येही महाराज खेळेल हे जवळपास निश्चित आहे.