IPL 2021 : आयपीएलमध्ये आपल्या पहिल्या विजयासाठी मुंबई सज्जं, बदलू शकतात PLAYING 11
आयपीएलमध्ये आज म्हणजेच मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर मॅच होणार आहे.
मुंबई: आयपीएलमध्ये आज म्हणजेच मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर मॅच होणार आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलमधील आपला पहिला पराभव विसरून पुन्हा परतीसाठी सज्ज होईल. पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबईचा पराभव केला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादविरुद्ध पहिल्या मॅचमध्ये 10 धावांनी विजय मिळवला आहे.
मुंबईसाठी एक चांगली बातमी आहे की, त्यांचा स्टार ओपनर क्विंटन डी कॉक या सामन्यासाठी संघात सामील होऊ शकतो. डी कॉक 7 एप्रिलला दक्षिण आफ्रिकेतून भारतात आला. कोरोनातील आयपीएलच्या नियमांनुसार डी कॉकला सात दिवस वेगळे रहावे लागले. यामुळे आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला डी कॉक विना मैदानावर उतरावे लागले. डी कॉकचा क्वारंटाइन कालावधी 13 एप्रिल रोजी म्हणजेच आज संपत आहे, त्यामुळे केकेआर विरुद्धच्या सामन्यात तो आज मैदानात उतरू शकतो.
रोहित आणि डी कॉक करु शकतात ओपनींग
डी कॉकच्या अनुपस्थितीत आरसीबीविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह क्रिस लिन हा सलामीवीर म्हणून मैदानात उतरला होता. या सामन्यात लिनने 35 चेंडूत 4 चौके आणि 3 छक्के मारुन 49 धावांची खेळी खेळली. परंतु डी कॉक मैदानावर उतरल्यामुळे कदाचित लिनला या सामन्यात बसावे लागू शकते. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा तिसर्या क्रमांकावर खेळणार आहे.
यानंतर इशान किशन चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल, पाचव्या क्रमांकावर किरन पोलार्ड तर सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या तसेच आवश्यक असल्यास अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्यालाही जलद गतीने धावा करण्यासाठी अप्पर ऑर्डरवर पाठवले जाऊ शकते.
तीन वेगवान बॅालर्सनां जागा मिळू शकेल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्याप्रमाणेच मुंबई तीन वेगवान बॅालर्ससह या सामन्यात उतरू शकेल. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट खेळणार आहेत. तर तिसरा वेगवान बॅालर म्हणून दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू मार्को जानसेनला घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्पिनर म्हणून पुन्हा एकदा अष्टपैलू क्रुणाल पंड्या आणि राहुल चहर यांना जबाबदारी देण्यात येईल.