दक्षिण आफ्रिका दौरा : टीम इंडिया संघाची घोषणा, रोहित शर्मा इन तर राहुल आऊट
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटींच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आला असून के. एल. राहुलला संघातून डच्चू देण्यात आला आहे. तर शुभमन गिल याला संधी देण्यात आली आहे. सलामी आणि मध्यफळीसाठी शुभमन गिलचा पर्यायी फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित आणि मयांक अग्रवाल ही जोडी आता टीम इंडियाच्या डावाला सुरुवात करणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करताना वेस्ट इंडीज दौर्यामध्ये विजयी झालेल्या भारतीय संघात काही बदल केले गेले आहेत. सलामीवीर केएल राहुलला संघातून वगळण्यात आले आहे. तरुण शुभमन गिल दाखल झाला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिली कसोटी २ ऑक्टोबरपासून खेळली जाईल. यापूर्वी दोन्ही संघ टी -२० मालिका खेळतील.
बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी गुरुवारी कसोटी संघाची घोषणा केली. संघाच्या घोषणेनंतर सलामीची नवीन जोडी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध डावाला सुरुवात करेल. रोहित शर्मा मयंक अग्रवाल यांच्यासह भारतीय डावाची सुरुवात करेल, अशी सर्व शक्यता आहे. एमएसके प्रसाद म्हणाले की, रोहित शर्माला आगामी मालिकेत सलामीवीर म्हणून संधी देण्याचा विचार आहे.
केएल राहुलशिवाय उमेश यादव यालाही भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. वेस्ट इंडिज दौर्यावर उमेश यादवचा कसोटी संघात समावेश होता, पण त्याला प्ले इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. उमेश यादव संघाबाहेर पडल्याने जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे फक्त तीन गोलंदाज टीम इंडियाचा वेगवान हल्ला सांभाळतील असा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताची १५ सदस्यीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृषभ पंत (यष्टीरक्षक), वृध्दिमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शुभमन गिल