धोनीचा तो सल्ला कोहलीनं ऐकला आणि भारत मॅच जिंकला!
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा दारूण पराभव केला.
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा दारूण पराभव केला. भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते रोहित शर्मा आणि विराट कोहली. रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या ९६ रन्समुळे भारतानं बांग्लादेशला नऊ विकेट राखून हरवलं.
रोहित आणि कोहलीमुळे भारत ही मॅच जिंकला असला तरी केदार जाधवनं महत्त्वाच्या वेळी घेतलेल्या दोन विकेटमुळे ही मॅच भारताच्या बाजून झुकली. केदार जाधवनं ७० रन्स केलेल्या तमीम इक्बालची आणि ६१ रन्स केलेल्या मुशफिकूर रहीमची विकेट घेतली आणि १२३ रन्सची पार्टनरशीप मोडली.
तमीम आणि मुशफिकूर हार्दिक पांड्याच्या बॉलिंगला झोडत असल्यामुळे कोहलीनं जाधवला बॉलिंग दिली आणि त्यानं कॅप्टन विराटचा विश्वास सार्थ ठरवला. केदार जाधवला बॉलिंग देण्याबाबत मी धोनीला सल्ला विचारला होता. धोनीनंही केदार जाधवला बॉलिंग दे सांगितल्यावर आम्ही तो निर्णय घेतल्याचं कोहली म्हणाला आहे.