विराटने धोनीलाही मागे टाकलं, बनवलं खास रेकॉर्ड
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा शानदार विजय झाला.
इंदूर : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा शानदार विजय झाला. २०२० या वर्षातला भारताचा हा पहिलाच विजय आहे. वर्षाच्या पहिल्याच मॅचमध्येही विराट कोहलीने विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एक हजार रन पूर्ण केले आहेत. विराट सगळ्यात जलद हजार रन पूर्ण करणारा कर्णधार बनला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये हजार रन पूर्ण करणारा विराट हा सहावा कर्णधार आहे. दुसऱ्या टी-२० सुरु होताना हजार रन पूर्ण करायला विराटला २५ रनची गरज होती. या मॅचमध्ये विराटने नाबाद ३० रनची खेळी केली आणि भारताला जिंकवून दिलं.
कर्णधार म्हणून १ हजार रन पूर्ण करणारा कोहली हा धोनीनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. धोनीने ६२ मॅचमध्ये १,११२ रन केले आहेत. कोहलीने या मॅचमध्ये रोहितचा विक्रमही मोडित काढला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विराट आता सर्वाधिक रन असणारा खेळाडू आहे.
मॅच सुरु होण्याआधी विराट आणि रोहित यांच्यानावावर टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी २,६३३ रन होत्या. पण या मॅचनंतर विराटच्या खात्यात २,६६३ रन झाल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजसाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी रोहित टीममध्ये पुनरागमन करेल.
श्रीलंकेविरुद्धची तिसरी टी-२० मॅच शुक्रवारी पुण्यात खेळवण्यात येणार आहे. ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये भारताने १-०ने आघाडी घेतली आहे. गुवाहाटीमधली पहिली टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाली होती.